

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेला ऐतिहासिक ‘किल्ले प्रतापगड’ इतिहासप्रेमी आणि पर्यटकांना जसाच्या तसा मूळ स्वरूपात पाहायला मिळावा, हा शासनाचा मुख्य मानस आहे. त्यानुसार गडाचे ऐतिहासिक वैभव जपत राज्य पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसारच हे संवर्धन काम सुरू असल्याची ग्वाही सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
स्थैर्य, सातारा, दि. १७ : किल्ले प्रतापगडावर सध्या सुरू असलेल्या संवर्धन कामाची पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर महाबळेश्वर येथील हिरडा नाका येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.
या पाहणी दौऱ्याला व पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, प्रांताधिकारी योगेश खरमाटे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी आणि किल्ले प्रतापगड संवर्धन समितीचे सदस्य विजय नायडू आदी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या प्रमुख सूचना आणि निर्णय:
-
कामाचा दर्जा आणि मुदत: पुरातन पद्धतीचे चुन्याचे काम मजबूत होण्यासाठी साधारण एका वर्षाचा कालावधी लागतो. वेळ दिला नाही तर काम ढिसाळ होऊ शकते. त्यामुळे वेळेचा विचार करून कामाचा दर्जा राखणे गरजेचे आहे, तरीही संवर्धनाचा पहिला टप्पा मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे देसाई म्हणाले.
-
पाणी मारण्याबाबत ठेकेदाराला ताकीद: संवर्धनाच्या बांधकामाला पाणी मारत नसल्याच्या तक्रारीची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली. गडावर पाणी कमी असले तरी ठेकेदाराने टँकरने पाणी आणून मारावे. या कामावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे लक्ष असून, कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा सक्त दम त्यांनी अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला भरला.
-
संवर्धन समितीचे नियंत्रण: या संवर्धन कामावर स्थानिक प्रतिनिधी आणि संवर्धन समितीचे सदस्य विजय नायडू यांनी नियमित लक्ष ठेवून पाहणी करावी, अशा सूचना देण्यात आल्या.
-
दुसऱ्या टप्प्याला लवकरच मान्यता: गडावरील तळ्यांच्या स्वच्छतेनंतर पुढील कामाला सुरुवात केली जाईल. तसेच संवर्धनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही लवकरच मान्यता दिली जाईल व निधीसाठी पाठपुरावा केला जाईल. गडावरील झाडेझुडपे काढून पुतळ्याजवळ जास्तीत जास्त नवी झाडे लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
-
एआय (AI) तंत्रज्ञानाचा वापर व भव्य गॅलरी: गडावरील अफझल खानाच्या वधाच्या जागेजवळ पर्यटकांसाठी एक भव्य गॅलरी प्रस्तावित आहे. याशिवाय, शिवप्रतापदिनाचा सुवर्ण इतिहास पर्यटकांसमोर जिवंत करण्यासाठी ‘एआय’ (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊन व मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीने हा प्रकल्प हाती घेतला जाईल.
-
महाबळेश्वर सुशोभीकरण: क्षेत्र महाबळेश्वर मंदिर परिसराच्या सुशोभीकरणाबाबत जिल्हाधिकारी व पुरातत्त्व विभागाने समन्वय साधून निर्णय घ्यावा. तसेच, महाबळेश्वर बाजारपेठेतील सुशोभीकरणाच्या कामाची पाहणी मंत्री मकरंद पाटील आणि आपण स्वतः एकत्र येऊन करू व योग्य निर्णय घेऊ, असेही शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले.
