
आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीत इंद्रायणी नदीला पूर आल्याने शहरातील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे भाविकांनी आळंदीत येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
स्थैर्य, आळंदी, दि. ०६ जुलै : आषाढी वारी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या तोंडावर आळंदीमध्ये मोठी चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला प्रचंड पूर आला असून आळंदी शहरातील नदीवरील चारही पूल पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून सध्या भाविकांनी आळंदी शहरात येऊ नये, असे जाहीर आवाहन प्रशासनाने केले आहे.
आळंदीत येणे सध्या सुरक्षित नाही
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी नगर परिषद आणि प्रशासनाकडून संयुक्त पत्रक काढून वारकरी व भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्याने आळंदीतील प्रमुख चारही पूल पाण्याखाली गेले असून शहरात प्रवेश करणे सध्या धोक्याचे बनले आहे. ज्या भाविकांनी आळंदीच्या दिशेने प्रवास सुरू केला आहे, त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आहे त्याच ठिकाणी थांबावे आणि आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
प्रशासनाचे नियम पाळण्याचे आवाहन
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि स्थानिक प्रशासन सज्ज असून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांनी आणि वारकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच बंद करण्यात आलेले पूल, नदीपात्र आणि घाट परिसरामध्ये जाणे पूर्णपणे टाळावे. प्रशासनाला सहकार्य करून सर्वांनी संयम बाळगावा, अशी विनंती ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व नगर परिषदेने केली आहे.
