जिल्ह्याला डेसिबल यंत्र सात; आवाजाचा दणदणाट मोजणार कसा?

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२३ | फलटण |
अलिकडच्या पंधरा-वीस वर्षात गणेशोत्सवात डॉल्बी यंत्रणा सहभागी झाल्याने तरुणाई बेफाम नाचू लागली. या डॉल्बीच्या दणदणाटानं कुणी कायमचं जायबंदी, कुणी पार बहिरं झालं, काहींचा तर जीवही गेला. त्यानंतर ‘डॉल्बीमुक्ती’ची चळवळ सुरू झाली. पण, आता येऊ घातलेल्या लोकसभा, विधानसभा, पालिका निवडणुका पाहता कार्यकर्ते डी.जे. नाच पुन्हा सुरू झाला आहे. खासदार, आमदारही या कार्यकर्त्यांच्या ख्यालीखुशालीसाठी याच भूमिकेत असल्याचे संकेत असले तरी २०१४ मध्ये डेसिबलची मर्यादा ओलांडून भिंत कोसळून जी दुर्घटना सातार्‍यात झाली, त्यामध्ये एकाचा बळी गेला होता. यामधून बोध घेऊन जिल्हा पोलीस आता अशा आवाजाच्या मर्यादा ओलांडणार्‍या डी.जे.चा मणका मोडण्याच्या तयारीत असले तरी जिल्ह्याला डेसिबल यंत्र अवघे सात असल्यामुळे आवाजाचा दणदणाट मोजणार कसा? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान, आवाजाचे डेसिबल मोजणारी यंत्रणा जरी मोजकीच असली तरी फलटण पोलीस सतर्क आहेत. त्यामुळे गणेशोत्सवासह आगामी निवडणुकांमध्ये आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍यांवर कडक कारवाई होणार, हे नक्की असल्याने फलटण पोलिसांनी मंडळांना डी.जे.च्या आवाजाची मर्यादा सांभाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आगामी निवडणुका पाहता आवाजाचा थाटमाट सुरू राहणार आहे. यासाठी डेसिबल यंत्रणा सात आहेत. त्यामुळे औद्योगिक क्षेत्र येथे दिवसा ७५ तर रात्री ७०, व्यापारी भागात दिवसा ६५ तर रात्री ५५ डेसिबल, निवासी क्षेत्रात दिवसा ५५ आणि रात्री ४५ डेसीबलची मर्यादा आहे. तर शांतता क्षेत्रामध्ये दिवसा ५० आणि रात्री ४० डेसीबलची मर्यादा ठेवण्यात आली आहे. या आवाजाची ध्वनीक्षेपक मर्यादा ओलांडणार्‍यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कारवाई ही होणारच आहे.

ध्वनिक्षेपकामुळे लहान मुले, गर्भवती स्त्रिया, आजारी व वृध्द नागरिकांना सर्वाधिक त्रास होत असतो. याचा विचार करता यापूर्वी सातारा जिल्ह्याचेे तत्कालीन पोलिस अधिक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी ध्वनीक्षेपकाच्या दणदणाटावर अंकुश ठेवला होता. तर डॉ. अभिनव देशमुख यांच्या काळात तर हा प्रश्न उच्च न्यायालयात गेला, तेव्हा ध्वनीक्षेपकाला परवानगी दिली गेली नव्हती. तर पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनीही ध्वनीक्षेपकाची बंदी कायमच ठेवली होती. त्यामुळे विद्यमान पोलिस अधीक्षक समीर शेख हेही आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असल्याने त्यांनीही गणरायाच्या आगमन मिरवणुकीवेळी ध्वनीक्षेपकाची मर्यादा ओलांडणार्‍या मंडळांवर व ध्वनीक्षेपकांवर कारवाई करण्याच्या सूचना सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत.

सातारा जिल्ह्यात शाळा, बँक, पतसंस्था, सरकारी कार्यालय येथे १२३०, तर सार्वजनिक गणेश मंडळांनी ५ हजार २८५ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर एक गाव एक गणपती जिल्ह्यात ५९६ ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. अतिसंवेदनशील गावात ३७ तर मिश्र वस्तीत ७७६ ठिकाणी असे एकूण ३५ लाख लोकसंख्येच्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात २ लाख ३५ हजार ६०८ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे गेल्या दहा-बारा दिवसांपूर्वी आक्षेपार्ह पोस्टवरून दंगल झाली होती. त्यातच आता गणेशोत्सव, त्यामुळे याबाबतची दक्षता घेत उत्सव काळात कोणतेही गालबोट लागू नये, म्हणून पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला आहे. यासाठी यावर्षी प्रथमच दोन एसआरपीच्या गाड्या जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी मिळाल्या आहेत. हा पोलिस बंदोबस्त ईद-ए-मिलाद या सणाचा विचार करुन देण्यात आला आहे. एसडीपीओ ८, पोनि. १८, सपोनि, पो.उनि.९०, पोलिस अंमलदार ११००, स्ट्रायगिंक १५, आरसीपी ४, आणि एसआरपीएफ २ कंपनी असा पोलिस फौजफाटा राहणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाचा दणका वाढला की, पोलिस त्याचा मणका मोडण्यासाठी अ‍ॅक्शन मोडवर असणार आहेत.

दरम्यान, आगामी निवडणुका पाहता कार्यकर्त्यांनी डॉल्बीसाठी उचल खाल्ली आहे. यासाठी काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चांगली वाजणारी डॉल्बी परजिल्ह्यातून आणण्यासाठी हजारोंचा इसार देवून ठेवला आहे, असे बोलले जात आहे. कार्यकर्ते डॉल्बीच्या आवाजासाठी लोकप्रतिनिधींकडे धाव घेवू लागले आहेत. पण, कायद्याच्या चौकटीत डेसीबलची मर्यादा घालून दिली आहे. ती ओलांडल्यास कारवाई ही अटळ आहेच, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. कारवाई होईल तेव्हा कायद्याच्या चौकटीत लग्नाची वरातही निघेल, त्यावेळी वरातीमागून आरती करायची वेळ कोणत्याच मंडळावर येवू नये, यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनो सावधानता बाळगा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍यांवर कारवाई – समीर शेख

सातारा जिल्ह्यात शाळा, बँक, पतसंस्था, सरकारी कार्यालय येथे १२३०, तर सार्वजनिक गणेश मंडळांनी ५ हजार २८५ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. तर ‘एक गाव एक गणपती’ जिल्ह्यात ५९६ ठिकाणी प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण २ लाख ३५ हजार ६०८ ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यांच्या विसर्जन मिरवणुकीची स्थळेही निश्चित करण्यात आली आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत ध्वनीक्षेपकाची मर्यादा घालून दिली आहे. यासाठी यापूर्वी हाताच्या बोटावर मोजण्यात येणारी डेसीबल यंत्रणा होती. त्यामध्ये वाढ करून आता ती प्रत्येक पोलिस स्टेशनला देण्यात आल्यामुळे जी मंडळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आवाजाची मर्यादा ओलांडणार त्यांच्यावर कारवाई होणार आहे.

मर्यादित आवाजाची ‘मेख’

गणेशोत्सव म्हटलं की, डॉल्बी वाजलीच पाहिजे, हा कार्यकर्त्यांचा आग्रह असतोच अन् लोकप्रतिनिधीही कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी पोलिसांकडे याबाबत हिरवा कंदील मागत असतात. पण आता ते ही सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन डॉल्बीचा आवाज डेसीबलच्या परवानगीचं उल्लंघन करणारा नसावा, असं ठणकावून सांगत आहेत. याचवेळी काही मंडळांच्या कार्यकर्त्यांचा हट्ट, वाढत जाणारी झिंग, खुमखुमी यामुळं तो आवाज मर्यादेत न राहता काही वेळातच वाढतो. अगदी कानठळ्या बसवणारा ठरतो. त्यामुळे या सार्‍यावर आता रामबाण उपाय म्हणजे आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍यांचा कणा पोलीस कायद्याने कारवाई करून मोडणार, हे नक्की आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनो सावधान राहा व आवाजाची मर्यादा पाळा, असे म्हणावे लागेल.


Back to top button
Don`t copy text!