उद्योजकांच्या सोईसाठी प्रत्येक पंधरवड्यात क्षेत्रीय अधिकारी बारामतीला येणार – सचिन बारवकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ सप्टेंबर २०२३ | बारामती |
बारामती व पणदरे एमआयडीसीतील उद्योजकांना लहानमोठ्या कामांसाठी एमआयडीसीच्या पुणे प्रादेशिक कार्यालयात हेलपाटे मारायला लागू नयेत, यासाठी क्षेत्रीय अधिकार्‍यांनी महिन्यातून दोनदा बारामतीला येऊन उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात, ही बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने केलेली मागणी रास्त असून यापुढे प्रत्येक पंधरवड्यात एमआयडीसीचे क्षेत्रीय अधिकारी नियमितपणे बारामती एमआयडीसी कार्यालयात येऊन उद्योजकांच्या समस्या सोडवतील, अशी ग्वाही एमआयडीसीचे पुणे प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली.

शुक्रवार, २२ सप्टेंबर रोजी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनने आयोजित केलेल्या उद्योजकांच्या बैठकीत बारवरकर बोलत होते.

याप्रसंगी बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, मनोज पोतेकर, मनोहर गावडे, संभाजी माने, हरीश कुंभारकर, एमआयडीसीचे उपाभियंता विजय पेटकर, भारत फोर्जचे सदाशिव पाटील, पियाजिओचे किरण चौधरी, चंद्रकांत काळे, डायनॅमिक्सचे मुकेश चव्हाण, जीटीएनचे संतोष कणसे, उद्योजक चंद्रकांत नलवडे, कृष्णा ताटे, संदीप जगताप, शिवाजी साळुंखे, अभिजित शिंदे, भारत मोकाशी, शिवराज जामदार, लक्ष्मण वीर, उदय रसाळ, सुधीर सूर्यवंशी, सर्जेराव दळवी, मारुती आव्हाड, अनिल कायगुडे, विनोद चौधरी, अजय भोसले आदी उद्योजक उपस्थित होते.

बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून आणलेल्या नियोजित ईएसआयसी हॉस्पिटलसाठी लवकरच पाच एकर जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती बारवकर यांनी यावेळी दिली.

एमआयडीसी पुणे प्रादेशिक कार्यालयातील क्षेत्रीय व्यवस्थापक यांनी महिन्यातून दोनदा समक्ष येऊन उद्योजकांच्या समस्या सोडवणे, केंद्र शासनाकडून आम्ही पाठपुरावा करून मंजूर करून घेतलेल्या ईएसआयसी हॉस्पिटलसाठी पाच एकर जागा त्वरित उपलब्ध करून देणे तसेच अनेक वर्षांपासून भाडेतत्वावरील जागेत उद्योग-व्यवसाय करणार्‍या प्रामाणिक उद्योजकांना विस्तारित एमआयडीसी क्षेत्रात प्राधान्याने भूखंड उपलब्ध करून देणे आदी प्रमुख मागण्या अध्यक्ष धनंजय जामदार यांनी बैठकीत केल्या.

डॉ. गौतमी दिघे यांनी सर्वरोग निदानासाठी रक्त तपासणीच्या अत्याधुनिक यंत्रावर प्रात्यक्षिक सादर करून सविस्तर माहिती दिली व कामगारांची आरोग्य तपासणी करून घेणेबाबत उद्योग प्रतिनिधींना आवाहन केले.

संभाजी माने यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!