फलटण: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईची धास्ती; ‘एफडीए’चे विशेष पथक सातारा जिल्ह्यात दाखल?

बारामती आणि अकलूजमधील कारवाईनंतर आता फलटणमध्येही अन्न व औषध प्रशासनाची (FDA) कारवाई होणार असल्याच्या चर्चेने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मुंबईतील विशेष पथक जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती समोर येत आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 12 जून : अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या राज्यभरातील धडक कारवाईमुळे सध्या हॉटेल्स, मेडिकल आणि रुग्णालयांचे संचालक धास्तावले आहेत. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथे नुकत्याच झालेल्या मोठ्या कारवाईनंतर, आता हीच मोहीम फलटणमध्ये राबवली जाणार असल्याच्या चर्चा गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि तालुक्यात रंगू लागल्या आहेत.

बारामती, अकलूजमध्ये परवाने रद्द

काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांच्या विशेष पथकाने बारामती आणि अकलूज येथे अचानक छापे टाकून मोठी कारवाई केली होती. यामध्ये स्वच्छतेचे आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनेक हातगाड्या, हॉटेल्स आणि मेडिकल स्टोअर्सवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर, काही हॉटेल्स आणि मेडिकल्सचे परवाने जागेवरच रद्द करण्यासारखी कठोर पावले उचलण्यात आली.

सातारा जिल्ह्यात मुंबईचे पथक दाखल

या धडक कारवाईचा धसका आता फलटणमधील व्यावसायिकांनी घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विशेष नियोजनानुसार मुंबई येथील ‘एफडीए’चे एक विशेष पथक सातारा जिल्ह्यात दाखल झाले आहे. हे पथक कोणत्याही पूर्वसूचनेविना थेट कारवाई करणार असल्याचे बोलले जात आहे.

स्थानिक अधिकाऱ्यांना डावलून गुप्तता

या विशेष पथकामध्ये नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे, याची कोणतीही अधिकृत माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. मात्र, कारवाईमध्ये संपूर्ण पारदर्शकता आणि गुप्तता राखण्यासाठी या पथकात स्थानिक अधिकाऱ्यांना सामावून न घेता, केवळ मुंबईतील अधिकाऱ्यांचाच समावेश करण्यात आल्याचे समजते.

या संभाव्य कारवाईच्या पार्श्वभूमीवर फलटण शहर व तालुक्यातील हॉटेल व्यावसायिक आणि औषध विक्रेत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, अनेकांनी नियमांची पूर्तता करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे.

Back to top button
Don`t copy text!