स्थैर्य, फलटण दि.७: फलटण तालुक्यातील श्री गजानन महाराज भक्तांसाठी फलटण एस.टी. आगाराच्यावतीने फलटण – शेगांव बस सेवा सुरु करण्यात आली असून भाविक भक्तांसह या मार्गावर प्रवास करणार्या प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन फलटण आगाराच्यावतीने करण्यात आले आहे.
फलटण – शेगाव ही बस फलटण एस.टी. स्टँडवरुन सकाळी सात वाजता सुटून शेगाव येथे रात्री साडेआठला पोहचणार आहे. शेगाववरुन सकाळी सात वाजता सुटून फलटण येथे सायंकाळी पावणे सातच्या सुमारास बस पोहचेल. सदर बस बारामती, कर्जत, जामखेड, बीड, जालना, चिखली, खामगाव मार्गे शेगावला जाईल, असेही फलटण आगाराच्यावतीने सांगण्यात आले.
दरम्यान, फलटण आगारातून आसू , होळ, शिंगणापूर, लोणंद, मुंजवडी, वाघोशी, वडूज, शिंदेनगर, झडकबाईचीवाडी या तालुक्यातील मुक्कामी बसेसही सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच गिरवी, लोणंद, पुसेगाव, बोडकेवाडी, ताथवडा, वडूज, तरडफ, राजाळे, आसु, शिंगणापूर या फेर्या सुरू करण्यात आल्या आहेत.