फलटण: नगराध्यक्षांची रात्री अचानक पाहणी; पालखी मार्ग आणि ‘नमो उद्याना’च्या कामांची घेतली झाडाझडती

दुपारी आढावा बैठक घेतल्यानंतर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर रात्रीच प्रत्यक्ष मैदानात; निष्काळजीपणा खपवून न घेण्याचा कंत्राटदाराला दिला इशारा.

स्थैर्य, फलटण, दि. ११ जून : फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी रात्री अचानक फलटण शहरात सुरू असलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाच्या कामांची आणि प्रस्तावित ‘नमो उद्याना’च्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. दुपारीच नगरपरिषदेमध्ये पालखी मार्गाचा आढावा घेतल्यानंतर, नगराध्यक्षांनी रात्री अचानकपणे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेट दिल्याने प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडाली.

पथदिव्यांच्या कामात दर्जा राखण्याचे निर्देश

पालखी महामार्गावर पथदिव्यांसाठी (स्ट्रीट लाईट) ज्या जागा अंतिम करण्यात आलेल्या आहेत, त्या ठिकाणी दिवे उभारणीच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाने विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच, कंत्राटदाराला स्पष्ट ताकीद दिली की, पथदिव्यांचे काम अत्यंत दर्जेदार पाळले पाहिजे आणि त्यासाठी दिव्यांचा पाया भक्कम करण्यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करावी. भविष्यात कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास त्याला संपूर्णपणे कंत्राटदार जबाबदार असेल, असे नगराध्यक्षांनी स्पष्ट केले.

‘नमो उद्याना’चे काम युद्धपातळीवर

स्वामी विवेकानंद नगर येथे रायगड हॉटेल शेजारी अनेक वर्षांपासून एक मोठी जागा मोकळी आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या ठिकाणी ‘नमो उद्याना’साठी निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या ठिकाणी प्रचंड दुर्गंधी आणि रस्त्यापासून खूप मोठा खड्डा असल्यामुळे उद्यान उभारण्यात तांत्रिक अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्यासाठी येथील सर्व कचरा हटवून खड्डा भरण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू आहे. या कामाची पाहणी करताना नगराध्यक्षांनी, खड्डा पूर्णपणे भरून जमीन एकसमान (लेव्हल) करावी आणि शहरात एक सुसज्ज व देखणे उद्यान तयार करावे, असे निर्देश दिले.

वकिलांशी संवाद आणि शहराच्या कायापालटाची ग्वाही

या जागेची पाहणी करत असताना रात्रीच्या वेळी फिरण्यासाठी बाहेर पडलेले फलटण शहरातील अनेक नामांकित वकील नगराध्यक्षांना भेटले. वकिलांनीही उद्यानाच्या संदर्भातील काही महत्त्वाच्या बाबी नगराध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी वकिलांशी संवाद साधताना समशेरसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, “अनेक वर्षे एकाच ठिकाणी सत्ता असूनही मागचे सत्ताधारी फलटण शहराचा कायापालट करण्यात अपयशी ठरले. परंतु, येणाऱ्या काही वर्षांत आपण फलटण शहराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलून टाकू,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

मान्यवरांची उपस्थिती

या अचानक केलेल्या पाहणी दौऱ्यादरम्यान महाराजा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे व्हाईस चेअरमन रणजीतसिंह भोसले, ज्येष्ठ नगरसेवक सुदाम (आप्पा) मांढरे, नगसेवक संदीप चोरमले, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवा नेते अमोल सस्ते आणि बांधकाम व्यावसायिक दीपक देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!