‘रणजितदादांच्या कार्यालयातून बोलतोय…’; अधिकाऱ्यांना फोनवरून फसवणाऱ्या भाडळी येथील भामट्याला फलटण पोलिसांकडून बेड्या!

स्थैर्य, फलटण, दि. ११ जून : माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावाचा आणि त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या नावाचा गैरवापर करून चक्क शासकीय अधिकाऱ्यांची फसवणूक करणाऱ्या एका भामट्याला फलटण पोलिसांनी आज शिताफीने ताब्यात घेतले आहे. हा संशयित भाडळी (ता. फलटण) येथील रहिवासी असून, त्याच्या या अटकेमुळे बोगसगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

नेमका प्रकार काय?

याबाबत सूत्रांकडून आणि पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, हा संबंधित व्यक्ती विविध शासकीय अधिकाऱ्यांना थेट मोबाईलवर संपर्क साधत होता. फोन केल्यानंतर तो अत्यंत आत्मविश्वासाने आपण ‘माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयातून बोलत आहे’, अशी बतावणी करत असे. रणजितदादांच्या नावाचा वापर करून अधिकाऱ्यांवर दबाव आणणे, वैयक्तिक कामे काढून घेणे आणि त्यांची फसवणूक करणे, असा त्याचा हेतू होता.

कॉल रेकॉर्डिंगवरून फुटले बिंग

काही सतर्क शासकीय अधिकाऱ्यांना या फोन कॉल्सबाबत संशय आला. त्यांनी या फोन कॉल्सची आणि संबंधित व्यक्तीची खातरजमा केली असता, या व्यक्तीचा माजी खासदार रणजितदादांच्या कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे आणि तो पूर्णपणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच, या भामट्याने अधिकाऱ्यांना केलेल्या फोन संवादाचे ‘कॉल रेकॉर्डिंग’ पुरावा म्हणून पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले.

या ऑडिओ क्लिप आणि तक्रारीची तातडीने दखल घेत फलटण पोलिसांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवली आणि थेट या संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या. सध्या त्याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याने आतापर्यंत अशा प्रकारे कोणकोणत्या अधिकाऱ्यांना किंवा नागरिकांना फसवले आहे, याची सखोल चौकशी पोलिसांकडून सुरू आहे.

कार्यालयाचे आवाहन

दरम्यान, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कार्यालयाच्या नावाने किंवा त्यांच्या पीएच्या नावाने जर कोणी फोन करून दबाव आणत असेल किंवा फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा भामट्यांच्या भूलथापांना बळी पडू नये. अधिकाऱ्यांनी आणि नागरिकांनी तत्काळ कार्यालयाशी समक्ष संपर्क साधून खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
Don`t copy text!