
स्थैर्य, फलटण, दि. ४ नोव्हेंबर : माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात रचण्यात आलेल्या एका षडयंत्राची सविस्तर माहिती ‘आयपीडीआर’ (IPDR) च्या माध्यमातून उघड झाली असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
या आयपीडीआर तपशिलात, व्हॉट्सॲप कॉल (WhatsApp Call) आणि फेसटाइम (FaceTime) द्वारे कुणी व कुणाला माहिती पुरवली, याचा भक्कम पुरावा हाती लागल्याचे समजते.
या माहितीच्या आधारे, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे स्वतः गजानन चौक येथे जाहीर सभा किंवा मुंबईत पत्रकार परिषद घेऊन, आयपीडीआरनुसार मिळालेली सर्व माहिती उघड करणार असल्याची चर्चा फलटण शहरात दबक्या आवाजात सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून फलटणमधील राजकीय वातावरण विविध कारणांनी तापलेले आहे. आता या आयपीडीआरच्या वृत्तामुळे आणि माजी खासदारांच्या संभाव्य गौप्यस्फोटाच्या चर्चेमुळे, फलटणच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडण्याची चिन्हे आहेत.
या सभेत किंवा पत्रकार परिषदेत नेमकी कोणती माहिती समोर येते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
आयपीडीआर (IPDR) म्हणजे काय?
आयपीडीआर (IPDR) म्हणजे ‘इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड’ (Internet Protocol Detail Record). हा एक प्रकारचा तांत्रिक लॉग (नोंद) असतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, इंटरनेट किंवा मोबाईल इंटरनेट नेटवर्कवरून होणाऱ्या कोणत्याही संवादाची (डेटा ट्रॅफिक) ही सविस्तर नोंद असते.
यामध्ये व्हॉट्सॲप कॉल, फेसटाइम किंवा इतर इंटरनेट आधारित संवाद कोणी, कोणाला, कधी, किती वेळ केला, यासाठी कोणते आयपी ॲड्रेस वापरले गेले, याचा तांत्रिक तपशील नेटवर्क ऑपरेटरकडे (उदा. मोबाईल कंपन्या) नोंदवला जातो. हा तपशील कायदेशीर तपासात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.
