फलटण: नीरा खोऱ्यातील धरणांची पाणीपातळी खालावली; पाणीसाठा अवघ्या ११.०३ टक्क्यांवर!

नीरा उजवा कालवा विभागाच्या ताज्या अहवालानुसार नीरा प्रणालीतील धरणांमध्ये सद्यस्थितीत केवळ ११.०३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पावसाने अद्याप दमदार हजेरी न लावल्याने चिंता वाढली आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 12 जून : नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रा. पो. मोरे यांनी १२ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या ताज्या अहवालानुसार, नीरा प्रणालीतील चारही धरणांमधील पाणीसाठा वेगाने खालावत आहे. सद्यस्थितीत धरणांमध्ये एकूण ५.३३ टीएमसी म्हणजेच केवळ ११.०३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा साठा ५ टक्क्यांहून अधिक कमी असल्याने सर्वांनाच दमदार मान्सूनची प्रतीक्षा लागून राहिली आहे.

धरणांमधील सद्यस्थिती आणि पाणीसाठा

नीरा प्रणालीमध्ये भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चार प्रमुख धरणांचा समावेश होतो. या चारही धरणांची मिळून एकूण साठवण क्षमता ४८.३३ टीएमसी इतकी आहे.

  • धरणांमधील पाणीसाठ्याची आकडेवारी (१२ जून २०२६):

धरणाचे नाव एकूण क्षमता (टीएमसी) सद्य पाणीसाठा (टीएमसी) टक्केवारी (%)
भाटघर २३.५० १.८६ ७.९१%
वीर ९.४१ १.८० १९.१३%
नीरा देवघर ११.७३ १.०१ ८.६१%
गुंजवणी ३.६९ ०.६६ १७.८९%
एकूण ४८.३३ ५.३३ ११.०३%

मागील वर्षाशी तुलना

गेल्या वर्षी (१२ जून २०२५ रोजी) याच दिवशी नीरा खोऱ्यातील धरणांमध्ये एकूण ७.८६ टीएमसी म्हणजेच १६.२६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा हा साठा ५.३३ टीएमसी (११.०३%) इतकाच राहिल्याने पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

कालवा विसर्ग आणि वीजनिर्मिती

पाण्याची कमतरता पाहता नीरा उजवा कालव्याचा विसर्ग आता कमी करण्यात आला आहे. सद्यस्थितीत नीरा डाव्या कालव्यातून ६२७ क्युसेक्स, तर नीरा उजव्या कालव्यातून ७०२ क्युसेक्स वेगाने पाण्याचे आवर्तन सुरू आहे. १ मार्च २०२६ पासून आतापर्यंत उजव्या कालव्यातून १३.०९ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. याशिवाय वीजनिर्मितीसाठी गुंजवणी धरणामधून १३० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरणक्षेत्रात पावसाने अद्याप अपेक्षित जोर धरलेला नाही. वीर धरण परिसरात आतापर्यंत एकूण २५ मिमी तर नीरा देवघर परिसरात २ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भाटघर आणि गुंजवणी धरणक्षेत्रात अद्याप पावसाची नोंद निरंक आहे.

Back to top button
Don`t copy text!