
आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली घटना; उदयसिंह निंबाळकर, रणजित काशीद आणि सहकाऱ्यांनी तातडीने वीजपुरवठा खंडित करून केली दुरुस्ती.
स्थैर्य, फलटण, दि. १२ जून : बुवासाहेब नगर पुलाच्या बाजूला असलेल्या एका ॲग्रो दुकानाजवळ आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास विद्युत खांबाला धडक लागून खांब कोसळल्याची घटना घडली. मात्र, परिसरातील नागरिक आणि युवा नेत्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आणि दुरुस्तीचे काम तातडीने मार्गी लागले.
नागरिकांच्या संपर्कानंतर तातडीने हालचाली
सकाळी अचानक विद्युत खांब कोसळल्याचे पाहताच परिसरातील जागरूक नागरिकांनी मोबाईलवरून युवा नेते उदयसिंह (बबलू) निंबाळकर आणि रणजित काशीद यांना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच या नेत्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि महावितरणच्या वायरमनला बोलावून घेऊन सर्वप्रथम परिसरातील विद्युत प्रवाह खंडित करायला लावला. वेळीच वीजपुरवठा बंद झाल्याने संभाव्य जीवितहानी आणि मोठा धोका टळला.
नवीन खांब उभारून वीजपुरवठा सुरळीत
धोका टळल्यानंतर युवा नेते उदयसिंह निंबाळकर आणि रणजित काशीद यांच्या समवेत युवा नेते अभिजीत शिंदे, शिवराज काटकर आणि इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून तातडीने नवीन पोल (खांब) बोलावण्यात आला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने कोसळलेला खांब बाजूला करून नवीन खांब उभा करत दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून घेण्यात आले.
सकाळच्या वेळेत घडलेल्या या घटनेनंतर तातडीने मदत उपलब्ध करून दिल्याबद्दल युवा नेत्यांनी दाखवलेल्या या तत्परतेचे परिसरातील नागरिकांकडून मोठे कौतुक होत आहे.