फलटण: तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन – सह दुय्यम निबंधक निलंबित

फलटण येथील सह दुय्यम निबंधक कार्यालयात तुकडेबंदी कायद्याचे उघड उल्लंघन करून दस्त नोंदणी केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला शासनाने निलंबित केले आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 12 जून : फलटण (क्रमांक 2) येथील सह दुय्यम निबंधक वर्ग 2 या पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याला राज्य शासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून बेकायदेशीर दस्तनोंदणी केल्याप्रकरणी राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने 11 जून रोजी निलंबनाचे कडक आदेश जारी केले आहेत.

1545 दस्तांची संशयास्पद नोंदणी

जानेवारी 2026 ते एप्रिल 2026 या कालावधीत ‘एक जिल्हा एक नोंदणी’ अंतर्गत संबंधित अधिकाऱ्याने इतर तालुक्यातील तब्बल 1545 दस्तांची नोंदणी केली. यातील फलटण, कराड, खंडाळा, वाई आणि माण तालुक्यातील 58 दस्तांमध्ये तुकडेबंदी कायद्याचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. उर्वरित दस्तांची तपासणीही विशेष पथकामार्फत सुरू आहे.

सक्षम प्राधिकरणाच्या प्रमाणपत्राविना व्यवहार

प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या हस्तांतरणासाठी सक्षम प्राधिकरणाचे प्रमाणपत्र (NOC) दस्तास जोडणे कायद्याने बंधनकारक असते. मात्र, हे प्रमाणपत्र न जोडताच दस्तांची नोंदणी करण्यात आली. महाराष्ट्र जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध व त्याचे एकत्रीकरण अधिनियम 1947 चे पालन न केल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.

मुख्यालय छत्रपती संभाजीनगरला हलवले

संबंधित अधिकाऱ्याची ही कृती गंभीर स्वरूपाची असून त्यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम 1979 चा भंग केला आहे. त्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या त्यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांचे मुख्यालय छत्रपती संभाजीनगर येथील सह जिल्हा निबंधक कार्यालयात निश्चित करण्यात आले असून, सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही.

Back to top button
Don`t copy text!