
स्थैर्य, फलटण, दि. ५ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, यंदा राजे गट विरुद्ध खासदार गट असा थेट सामना रंगणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य सभा आयोजित करून प्रचाराचा एक प्रकारे शुभारंभ केला आहे. तर आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी शनीनगर येथील सभेतून हाच प्रचाराचा नारळ असल्याचे जाहीर केले आहे.
यावेळची नगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पक्षातील वरिष्ठ नेत्यांना आपले वर्चस्व दाखवून देण्यासाठी नगरपालिका ताब्यात घेणे गरजेचे आहे. तर आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांना त्यांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवणे आवश्यक आहे. जो गट नगरपालिकेवर सत्ता मिळवेल, त्यांच्याकडेच आगामी काळातील तालुक्याच्या राजकारणाची सूत्रे राहण्याची शक्यता आहे.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गटात शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांचे शेकडो प्रवेश झाले आहेत. त्यामुळे तिकीट वाटप करताना विविध प्रभागांमध्ये नाराजी निर्माण होण्याची शक्यता आहे. बंडखोरी रोखण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे, अन्यथा त्याचा फटका त्यांच्या गटाला बसू शकतो. महायुतीतील भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपावरही सध्या चर्चा सुरू आहेत.
दुसरीकडे, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे गटाला अनेक प्रभागांमध्ये तिकीट देण्यासाठी दिग्गज पदाधिकाऱ्यांचा शोध घ्यावा लागणार आहे. २००६ पासून सक्रिय असलेल्या माजी नगरसेवकांना यंदा पुन्हा तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आमदार रामराजे यांचे सुपुत्र आणि माजी नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी चर्चेत आहे. ते निवडणूक लढवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असलेली राष्ट्रवादी अजित पवार गटातील घरवापसी खरोखर होणार की त्या केवळ अफवाच ठरणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

