
स्थैर्य, फलटण, दि. ४ नोव्हेंबर : लोकशाही भारत न्यूज नेटवर्कचे संपादक सागर राजेंद्र चव्हाण यांनी मंगळवारी माणुसकीचे दर्शन घडवले. त्यांना पहाटे सापडलेला मोबाईल त्यांनी मूळ मालक, ट्रक ड्रायव्हर निलेश बाबुराव धायगुडे यांना परत करून एक सामाजिक आदर्श ठेवला.
ओळख पटवून मोबाईल परत केल्यानंतर धायगुडे भावनाविवश झाले. मोबाईल परत मिळाल्यावर त्यांनी चव्हाण यांचे आभार मानत गळाभेट घेतली. त्यांनी चहा-पाण्याचा आग्रह केला, मात्र त्याचवेळी “सध्या माझ्याकडे पैसे नाहीत,” असे प्रामाणिकपणे सांगितले. त्यांच्या या साधेपणावर, “काही अडचण नाही. मोबाईल परत देण्याचं समाधान हेच माझं चहापाणी आहे,” असे चव्हाण यांनी हसतमुखाने सांगितले.
फलटण शहर पोलीस स्टेशनसमोरील परिसरात सुषमा अंधारे यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाच्या वार्तांकनादरम्यान हा प्रसंग घडला. यावेळी पत्रकार अजय माळवे, यशवंत खलाटे पाटील, सुरेंद्र ननावरे, सुभाष भांबुरे, सुधीर अहिवळे, संजय गायकवाड, विजय भिसे आणि विक्रम चोरमले यांच्यासह अनेक माध्यम प्रतिनिधी उपस्थित होते.
