नितीश कुमार मुंबई दौऱ्यावर; उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट घेणार! 2024 साठी विरोधकांकडून पुढील रणनीतीवर चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । मुंबई । आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) भाजपचा रथ रोखण्यासाठी विरोधकांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विरोधी पक्षनेते सतत एकमेकांना भेटून पुढील रणनीतीवर चर्चा करत आहेत. मात्र, विरोधी पक्षात पंतप्रधानपदासाठी अनेक दावेदार आहेत, त्यामुळे आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एकाही नावावर एकमत झालेले नाही.

दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे शिवसेनेचे (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे  शरद पवार यांची लोकसभा निवडणूक 2024 साठी विरोधकांची जमवाजमव करण्यासाठी भेट घेणार असल्याची बातमी समोर आली आहे. मुंबईत 11 मे रोजी ही महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीदरम्यान निवडणुकीच्या रणनीतीवर चर्चा होणार आहे. नितीश कुमार यांनी यापूर्वीच अखिलेश यादव, ममता बॅनर्जी आणि केसीआर यांची भेट घेतली आहे.

दुसरीकडे, 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांचा समान किमान कार्यक्रम तयार केला जाईल, असे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधीच सांगितले आहे. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे शरद पवार म्हणाले होते. तसेच, येत्या 10-11 महिन्यांत अनेक राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. नितीश कुमार, चंद्रशेखर राव, अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी असे नेते विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न करत आहेत.

पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल?
दरम्यान, नितीश कुमारच नाही तर केसीआर यांनी याआधी इतर राज्यांमध्ये जाऊन अखिलेश यादव आणि नितीश कुमार यांसारख्या दिग्गज विरोधी नेत्यांचीही भेट घेतली आहे, परंतु आतापर्यंत विरोधी पक्षातील एकाही नेत्याच्या नावावर पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून एकमत झालेले नाही. विरोधी पक्षात शरद पवार, नितीश कुमार, केसीआर, ममता बॅनर्जी असे अनेक बडे नेते पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जातात.

भाजपसमोर आव्हान
विशेष म्हणजे, पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होऊ शकतात. या आगामी लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक मिळवता येईल का, हे भाजपसमोर आव्हान आहे. दुसरीकडे, भाजपच्या नेतृत्वाखालील युतीच्या बहुमताचा आकडा आधी रोखून आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या रणनीतीवर विरोधक काम करत आहेत. मात्र, यात काँग्रेसची भूमिका काय असेल, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.


Back to top button
Don`t copy text!