

स्थैर्य, सातारा, दि. ७ जून : वाठार-वाई मार्गावरील एसटी बसमध्ये एक महिला प्रवासी आपली सुमारे ७ तोळे सोन्याचे दागिने असलेली बॅग विसरली होती. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांनी अत्यंत प्रामाणिकपणा दाखवत ही लाखो रुपयांची बॅग संबंधित महिलेला सुखरूप परत केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ६ जून) सायंकाळी ४.४५ वाजता वाठारहून वाईकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. या गर्दीत वाई येथील एका महिला प्रवाशाची दागिन्यांची बॅग बसमध्येच राहिली. या बॅगमध्ये सुमारे ७ तोळे सोन्याचे दागिने होते, ज्यांची बाजारातील किंमत अंदाजे १० ते ११ लाख रुपये इतकी आहे.
बॅग बसमध्येच राहिल्याचे लक्षात आल्यावर वाई आगारातील बस चालक, वाहक आणि इतर आगार कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवली. त्यांनी कोणतीही लालसा न ठेवता ती बॅग सुरक्षितपणे आपल्या ताब्यात ठेवली. त्यानंतर त्यांनी तातडीने संबंधित महिला प्रवाशाशी संपर्क साधला आणि त्यांची बॅग व त्यातील सर्व दागिने त्यांना सुखरूप परत केले.
एसटी कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता आणि जबाबदारीच्या भावनेमुळे एसटी महामंडळाची प्रतिमा अधिक उजळली असून, सर्वसामान्य नागरिकांकडून या कर्मचाऱ्यांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.
