कुठे बाराशे तर कुठे अडीज हजार; पाणीटंचाई भेडसावत असलेल्या पुणेकरांसमोर टँकरचा काळाबाजार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ मे २०२३ । पुणे । ऐन उन्हाळ्यात पाण्याच्या टँकरला शहरात मागणी वाढली असल्याने टँकरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. शहरातील प्रत्येक भागात पाण्याच्या टँकरसाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. काही ठिकाणी १ हजार ३००, काही भागात १ हजार ५०० रूपये तर काही ठिकाणी २ ते २ हजार ५०० हजार रुपयांना नागरिकांना टँकर विकत घ्यावा लागत आहे. वापरण्याच्या पाण्याचा टँकरही ७०० ते ८०० रुपयांना मिळत आहे. पाणीटंचाई भेडसावत असलेल्या भागात टँकरचा काळाबाजारही सुरू झाला असून, महापालिकेकडून पाणी घेऊन ते तिप्पट ते चौपट दराने विकण्याचेही प्रकार सुरू झाले आहेत. मात्र या प्रकाराकडे पालिका दुर्लक्ष करत आहे.

महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावर पालिकेचे तसेच महापालिकेने ठेकेदारी पद्धतीने दिलेले व खासगी अशा तिन्ही प्रकारचे टँकर भरले जातात. पालिकेच्या टँकरसह खासगी टँकरलाही मागणी वाढली आहे. महापालिकेकडून कमी दराने टँकर भरून अनेक मोठ्या सोसायट्यांमध्ये चढ्या दराने पाणी दिले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्या भागात पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेला अडचणी येतात, अशा ठिकाणी पालिकेच्यावतीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा केला जातो.

सोसायटीनुसार ठरतात टँकरचे दर

एखाद्या सोसायटीला ज्या टँकरचालकाने पाणी दिले असेल त्यानेच त्या सोसायटीला पाणीपुरवठा करायचा इतर ठेकेदाराला या ठिकाणी पाणीपुरवठा करण्यास मज्जाव केला जातो. यामुळे पाण्याची गरज भागविण्यासाठी नागरिकांना टँकर ठेकेदाराला मागेल त्या दराने टँकर घ्यावा लागतो. खासगी टँकर चालकांकडून महापालिका ६३४ ते १ हजार ४०८ रूपये या दरम्यान शुल्क आकारते. खासगी टँकरचालक नागरिकांकडून एका टँकरसाठी अंतरानुसार १ हजार ३०० ते २ हजार ५०० रूपये घेत असल्याचे समोर आले आहे. अनेकदा सोसायटी पाहून टँकरचे दर आकारले जात असल्याचे समोर आले आहे.

येथे वाढल्या टँकरच्या फेऱ्या

सध्या टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. शहराचा पूर्व भाग असलेल्या वडगावशेरी, लोहगाव, खराडी, विमाननगर, कात्रज व परिसर, वारजे, पौड रस्ता, पाषाण, कोंढवा आदी उपनगरांमध्ये टँकरच्या फेऱ्या वाढल्या आहेत. काही खासगी टँकरचालक महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रांवरून पाणी घेतात तर काही टँकर समाविष्ट गावांमध्ये असलेल्या खासगी विहिरी, बोअरवेलमधूनही टँकर भरून घेतात. पालिकेच्या भरणा केंद्रावर मोठी रांग असल्याने सध्या अशा सर्व विहिरींवरून टँकर भरणा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!