

स्थैर्य, सातारा, दि. ७ जून : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या त्रिपुटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या छतावर एक मोठे झाड कोसळले. यामुळे शाळेच्या पत्र्यांचे प्रचंड नुकसान झाले असून इमारतीची मोठी हानी झाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांनी शनिवारी जिल्हा परिषद सदस्य हणमंतराव जगदाळे यांच्यासह घटनास्थळी प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी शाळेच्या नुकसानीची सविस्तर पाहणी करून महसूल विभागाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या. तसेच, शाळेच्या दुरुस्तीचे काम त्वरित सुरू करण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले.
पाहणी दौऱ्यादरम्यान उपस्थित ग्रामस्थांनी परिसरातील इतर काही महत्त्वाच्या समस्या डॉ. शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यात प्रामुख्याने सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील त्रिपुटी खिंड परिसरातील साईड पट्टीची झालेली दुरवस्था आणि वन विभागाच्या हद्दीत वाढलेल्या झाडे-झुडपांमुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका यावर उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.
ग्रामस्थांच्या या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत, डॉ. शिंदे यांनी आश्वासन दिले की, या सर्व समस्या आमदार महेश शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातील. तसेच, त्रिपुटी परिसरातील हे सर्व प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील.
या पाहणीवेळी स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
