कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मान्सूनची हजेरी; नवजा येथे ८ मिमी तर महाबळेश्वरमध्ये ३ मिमी पावसाची नोंद


स्थैर्य, सातारा, दि. ७ जून : केरळनंतर आता महाराष्ट्रातही मान्सून सक्रिय झाला असून सातारा जिल्ह्यासाठी ही अत्यंत सुखावणारी बातमी आहे. तळकोकणासह घाटमाथ्यावर मान्सूनच्या पहिल्या आनंदसरी बरसल्या आहेत. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे ८ मिलीमीटर, महाबळेश्वरमध्ये ३ तर कोयनानगरमध्ये १ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणात अद्याप पाण्याची आवक सुरू झाली नसली तरी मान्सूनच्या या वर्दीने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आणि उद्योग विश्वाचा कणा मानल्या जाणाऱ्या कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या पाण्यावर तयार होणाऱ्या विजेमुळे संपूर्ण महाराष्ट्र प्रकाशमान होतो, तसेच पूर्वेकडील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची मोठी गरज भागते. याच पाण्यामुळे सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागही सुजलाम सुफलाम झाला आहे.

मात्र, यंदाच्या कडक उन्हाळ्यामुळे कोयना धरणातील पाणीसाठा कमालीचा घटला आहे. धरणाच्या उदरात गडप झालेल्या गावांचे अवशेष उघडे पडले असून बामणोली आणि तापोळा परिसरातील पर्यटन ठप्प झाले आहे. उन्हाळ्याची वाढती तीव्रता आणि घटलेल्या पाणीपातळीमुळे वीजनिर्मितीही सध्या बंद करावी लागली आहे.

पाऊस सुरू होईपर्यंत धरणातील उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक असल्याने, महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम १९७६ च्या तरतुदीनुसार कोयना नदीतून शेती आणि औद्योगिक (बिगर सिंचन) कारणांसाठी पाणी उपसा करण्यावर प्रशासनाने बंदी घातली आहे.

यंदा मान्सूनवर एल निनोचे सावट असल्याने सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. यामुळे पाऊस लांबण्याची भीती व्यक्त होत होती आणि प्रशासनही संभाव्य टंचाईच्या नियोजनाला लागले होते. मात्र, अशा चिंताजनक परिस्थितीत कोयना धरण परिसरात मान्सूनच्या आनंदसरी बरसल्याने बळीराजासह सर्वांच्याच आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!