कराड उड्डाणपुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून पाहणी; कामाला गती देण्याच्या सूचना


स्थैर्य, सातारा, दि. ७ जून : सातारा लोकसभा मतदारसंघातील कराड शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बहुचर्चित सहापदरी उड्डाणपुलाच्या बांधकामाची खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांच्या सोयीसाठी हा उड्डाणपूल लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी कामाला गती द्यावी, अशा कडक सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

या पाहणी दौऱ्यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि माजी आमदार आनंदराव पाटील यांच्यासह अनेक प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी माहिती देताना खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, शेंद्रे ते नेर्ले या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांतर्गत ३.४७ किलोमीटर लांबीच्या या सहापदरी उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या संपूर्ण प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे २२२० कोटी रुपये असून, त्यापैकी केवळ या उड्डाणपुलाची अंदाजे किंमत ४५० कोटी रुपये इतकी आहे.

बांधकामाची पाहणी केल्यानंतर, पुलाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच, वाहतुकीसाठी रस्ता खुला करण्यापूर्वी सुरक्षिततेशी संबंधित सर्व आवश्यक बाबी पूर्ण कराव्यात, जेणेकरून प्रवाशांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

हा महत्त्वाचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या एकत्रित प्रयत्नांतून पूर्णत्वास जात असल्याचे खासदार भोसले यांनी आवर्जून नमूद केले.

या उड्डाणपुलामुळे कराड शहरात होणारी वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होणार आहे. तसेच पुणे–बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरळीत होईल, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अपघातांचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.


Back to top button
Don`t copy text!