
आंबेडकरी चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ते आणि समता सैनिक दलाचे मेजर जनरल कालकथित बाबु विष्णू सावंत यांच्या गोवंडी येथील निवासस्थानी जाऊन डॉ. भीमराव आंबेडकर यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत आदरांजली वाहिली.
स्थैर्य, मुंबई, दि. ११ जून : आंबेडकरी चळवळ आणि धम्म चळवळीशी अखंड निष्ठा राखणारे समता सैनिक दलाचे मेजर जनरल तथा ज्येष्ठ कार्यकर्ते कालकथित बाबु विष्णू सावंत (गुरुजी) यांचे रविवार, दि. ७ जून रोजी निधन झाले. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे प्रमुख आद. डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांनी स्वर्गीय सावंत यांच्या गोवंडी येथील लुंबिनीबाग निवासस्थानी जाऊन त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण केली.
व्यस्त दौऱ्यातून वेळ काढत कुटुंबीयांचे सांत्वन
बाबु विष्णू सावंत यांचे निधन झाले, त्यावेळी डॉ. भीमराव आंबेडकर हे लखनौ येथे पूर्वनियोजित धम्म व सामाजिक कार्यक्रमासाठी उपस्थित होते. देशभरातील व्यस्त दौरे सांभाळत असतानाही ते ९ जून रोजी पहाटे ३ वाजता मुंबईत दाखल झाले. विश्रांती न घेता दिवसभर न्यायालयीन कामकाज पूर्ण करून त्यांनी लगेचच सावंत कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्वर्गीय सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तसेच कुटुंबीयांचे सांत्वन करून त्यांना आर्थिक मदतही दिली.
सामान्य कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व आपुलकी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व असूनही डॉ. भीमराव आंबेडकर यांनी कोणताही मोठेपणा न बाळगता एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवला. झोपडपट्टीतील अरुंद गल्लीपर्यंत पोहोचून त्यांनी दिलेला हा आपुलकीचा स्पर्श उपस्थितांच्या मनाला भावून गेला. बाबु विष्णू सावंत यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळ, धम्म चळवळ आणि आंबेडकर परिवाराची निस्वार्थ सेवा केली होती.
निष्ठावंत सैनिकाचा गौरव
डॉ. भीमराव आंबेडकर हे नेहमीच कार्यकर्त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत आले आहेत. त्यांनी बाबु सावंत यांना वाहिलेली कृतज्ञता ही केवळ एका कार्यकर्त्याला वाहिलेली आदरांजली नसून, चळवळीतील प्रत्येक निष्ठावंत सैनिकाच्या कार्याचा गौरव असल्याची भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.