दैनिक स्थैर्य | दि. 08 जानेवारी 2023 | फलटण | शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, शिक्षण उपसंचालक कार्यालय, कोल्हापूर व फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण संचलित मुधोजी महाविद्यालय वरिष्ठ व कनिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ भारत आणि विकसित भारत अभियान प्रेरीत” या घोष वाक्याखाली तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकी व सेवाभाव निर्माण करण्यासाठी मौजे फडतरवाडी तालुका फलटण येथे गुरुवार दिनांक 4 ते 10 जानेवारी रोजी विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे.
या शिबिराचे उद्घाटन फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम, वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय दिक्षित, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संजय वेदपाठक, फडतरवाडी गावच्या सरपंच सौ. पौर्णिमा काटे, उपसरपंच अमोल फडतरे यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
शिबिरात अनेक प्रबोधन पर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी व्यक्तिमत्व विकासावर, सरोज बडगुजर यांनी “शून्य कचरा व्यवस्थापन” यावर व्याख्यान दिले. तसेच याच दिवशी दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून उत्सहात साजरा केला जातो त्याचे औचित्य साधून मौजे फडतरवाडी गावचे सरपंच व उपसरपंच यांनी उपस्थित पत्रकारांचा सत्कार केला.
या शिबिराचा समारोप समारंभ दि. १० रोजी बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.