

स्थैर्य, सातारा, दि. १२ : जिल्हा परिषद सेस निधीतून राबविण्यात येणाऱ्या विविध लाभाच्या योजनांसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत अनेक अडचणी येत होत्या. या अडचणींची गंभीर दखल घेत, कृषी समिती आणि पशुसंवर्धन समितीच्या सभेत आता पुन्हा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे.
पशुसंवर्धन समितीच्या सभेतील प्रमुख निर्णय:
-
शेतकऱ्यांच्या सोयीसाठी योजनांचे अर्ज ऑफलाईन स्वीकारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
-
साताऱ्यातील राजवाडा येथील पशुचिकित्सालयाची जागा नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव या सभेत सर्वानुमते नामंजूर करण्यात आला.
कृषी समितीच्या सभेतील प्रमुख निर्णय:
-
पशुसंवर्धन समितीच्या धर्तीवरच कृषी योजनांसाठीही ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
-
साताऱ्यातील प्रमुख पिके असणाऱ्या आले आणि हळद या पिकांचा ‘पीक विमा योजनेत’ समावेश करण्यासाठी राज्य शासनाकडे विशेष शिफारस करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
सभेस उपस्थित मान्यवर अधिकारी:
-
पशुसंवर्धन समिती: या सभेला सर्व सदस्यांसह जिल्हा उपायुक्त (पशुसंवर्धन व दुग्ध विकास) दिनकर बोर्डे आणि सहाय्यक आयुक्त विनोद पवार उपस्थित होते. या सभेमध्ये विभागाच्या सर्व कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
-
कृषी समिती: या बैठकीस जिल्हा कृषी विकास अधिकारी गजानन ननवरे, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील श्री. रनवरे, सामाजिक वनीकरण विभागाच्या श्रीमती शिरगावे आणि एमआरईजीएसचे कृषी अधिकारी श्री. पवार प्रामुख्याने उपस्थित होते.