महाराष्ट्रात प्रथमच! सातारा जिल्हा परिषदेकडून महिलांसाठी ‘AI’ प्रशिक्षण; सोबतच रोजगार मेळाव्याचेही आयोजन

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने महिलांसाठी राज्यात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित प्रशिक्षण आणि रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. समितीच्या सभापती सौ. ऋतुजा विराज शिंदे यांनी ही माहिती दिली.

स्थैर्य, सातारा, दि. १२ : बदलत्या काळानुसार महिलांनी तंत्रज्ञानात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, या उद्देशाने सातारा जिल्हा परिषदेमार्फत एक अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महिला व बाल कल्याण समितीच्या माध्यमातून महिलांसाठी महाराष्ट्रात प्रथमच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ (Artificial Intelligence – AI) आधारित विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती सौ. ऋतुजा विराज शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेत या महत्त्वपूर्ण उपक्रमाची माहिती दिली. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिलांसाठी एक विशेष ‘रोजगार मेळावा’ आयोजित करून त्यांना रोजगाराच्या विविध संधीही उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या प्रशिक्षण कार्यक्रमातील प्रमुख वैशिष्ट्ये आणि इतर निर्णय:

  • शेती आणि दैनंदिन जीवनात AI चा वापर: या प्रशिक्षणामध्ये ग्रामीण भागातील महिलांना दैनंदिन जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा, तसेच शेतीसाठी लागणारी अवजारे, खते व त्यांचा योग्य वापर याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

  • डिजिटल मार्केटिंग आणि सायबर सुरक्षा: डिजिटल मार्केटिंगचे प्रशिक्षण देऊन महिलांना स्वतःच्या व्यवसायाचे AI च्या माध्यमातून मार्केटिंग कसे करावे, याचे मार्गदर्शन केले जाईल. तसेच महिलांची सायबर फसवणूक टाळण्यासाठी ‘सायबर क्राईमपासून बचावाचे’ प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

  • आर्थिक साक्षरता: महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात यासाठी त्यांना टॅक्सेशन (करप्रणाली), अकाउंटिंग आणि फोन बँकिंगविषयीही अद्ययावत प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय:

  • अंगणवाडीत साखरेऐवजी गुळाचा वापर: अंगणवाडीतील पोषण आहारामध्ये दिल्या जाणाऱ्या गव्हाच्या खिरीसाठी साखरेऐवजी ‘पौष्टिक गुळाचा’ वापर करण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. साखरेतील सल्फर हा घटक बालकांच्या आरोग्यास अपायकारक ठरू शकतो, तसेच अलीकडे काही बालकांमध्ये जन्मत: मधुमेहाचे प्रमाण दिसून येत असल्याने हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

  • ‘राणी लक्ष्मीबाई’ योजनेतून स्वसंरक्षणाचे धडे: समाजामध्ये मुलींसाठी वाढत असलेल्या असुरक्षित वातावरणाची गंभीर दखल घेत, ‘राणी लक्ष्मीबाई’ योजनेअंतर्गत मुली व महिलांसाठी ज्युडो-कराटे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे.

SMART आणि Digital (AI) अंगणवाडी संकल्पना

या सर्व उपक्रमांसोबतच जिल्ह्यात आता ‘स्मार्ट अंगणवाडींसह’ ‘डिजिटल (AI) अंगणवाडी’ ही आधुनिक संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये स्मार्ट टीव्हीद्वारे डिजिटल शिक्षण, स्मार्ट किट, शैक्षणिक साधने, खेळणी आणि बाल आरोग्य तपासणी उपकरणे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!