आगामी काळात महिला अनेक क्षेत्रांत नेतृत्व करतील – राज्यपाल रमेश बैस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२३ । मुंबई । पोलीस दलात भरती होण्यास पूर्वी महिला उत्सुक नसत. अशा काळात पोलीस दलात भरती होऊन उपअधीक्षक पदापर्यंत प्रवास करणाऱ्या सुनिता नाशिककर अनेक महिलांना पोलीस दलात भरती होण्यास प्रेरित करीत आहेत. आगामी काळात पोलीस दलासह समाजाच्या सर्वच क्षेत्रात महिलांचे प्रमाण लक्षणीय वाढेल व त्या अनेक क्षेत्रात समाजाला नेतृत्व प्रदान करतील, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

राज्यपाल श्री. बैस यांच्या हस्ते सेवानिवृत्त पोलीस उप-अधीक्षक सुनिता नाशिककर यांनी लिहिलेल्या ‘मी, पोलीस अधिकारी’ या पोलीस सेवेतील अनुभवावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. १६) राजभवन येथे संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

पोलीस दलात नोकरी करणे आव्हानात्मक आहे. विशेषतः महिलांना कौटुंबिक जबाबदारी पार पाडून दिवसातील मोठा वेळ कर्तव्य बजावण्यासाठी द्यावा लागतो. सार्वजनिक उत्सव, निवडणुका, गणेश विसर्जन अशा प्रसंगी कर्तव्याच्या ठिकाणी जास्त वेळ द्यावा लागतो. लोकसंख्या वाढीच्या प्रमाणात पोलिसांची संख्या कमी आहे. कामाच्या तणावामुळे आरोग्याच्या समस्यादेखील उद्भवतात. परंतु आज परिस्थिती महिलांसाठी अधिक अनुकूल होत आहे असे सांगून आपल्या अनुभवांचे दस्तावेजीकरण केल्याबद्दल राज्यपालांनी लेखिका सुनिता नाशिककर यांचे अभिनंदन केले.

यावेळी आमदार संजय केळकर, लेखिका सुनिता नाशिककर व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!