साताऱ्यातील चौपाटीवर “एक व्यक्‍ती, एक गाडा’ धोरण राबवा


 

स्थैर्य, सातारा, दि.४: सातारा नगरपालिकेकडून येथील राजवाडा परिसरात असणारी चौपाटी स्थलांतरित करण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात आल्या आहेत. नव्याने चौपाटी तयार करताना “एक व्यक्‍ती, एक गाडा’ असे धोरण राबविण्याची मागणी चौपाटीवरील सर्वसामान्य व्यावसायिकांनी केली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून येथील राजवाड्यासमोर असणाऱ्या मोकळ्या मैदानात चौपाटी भरते. एक, दोन गाड्यांपासून सुरू झालेल्या चौपाटीवर सध्या 105 गाड्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून मार्चपासून ही चौपाटी बंद करण्यात आली. चौपाटी बंदच असल्याने त्यावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिक, कामगारांच्या रोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अनलॉक प्रक्रियेत चौपाटी सुरू करण्याची मागणी व्यावसायिकांनी जिल्हाधिकारी कार्यालय, तसेच सातारा नगरपालिकेकडे केली होती. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर सातारा पालिकेने ही चौपाटी राजवाडा येथे सुरू करण्याऐवजी दुसऱ्या जागी स्थलांतरित करण्यासाठी पर्यायी जागा शोधली.

त्यानूसार राजवाडा परिसरातील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ पालिकेच्या मालकीची आठ गुंठे जागा आहे. त्या जागी चौपाटी स्थलांतरित करण्यासाठी पालिकेचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किशोर शिंदे यांनी पुढाकार घेत सपाटीकरण पूर्ण करुन घेतले. ही चौपाटी स्थलांतरित करताना “एक व्यक्‍ती, एक गाडा’ हे धोरण राबविणे आवश्‍यक असल्याचे मत चौपाटीवरील सर्वसामान्य व्यावसायिकांनी नोंदविले. मनगटाच्या जोरावर चौपाटीवर अनेकांनी हातगाडे टाकून जागा अडवून ठेवल्या होत्या. या जागा इतरांना भाड्याने देत अनेकांनी हजारोंच्या घरात भाडे आकारण्याचा बिनभांडवली धंदा गेली अनेक वर्षे सुरू ठेवला होता. “बळी तो कानपिळी’ या म्हणीनुसार जुन्या चौपाटीवर जागा अडवून ठेवण्याचा धंदा पुन्हा नवीन चौपाटीवर सुरू होऊ नये, यासाठी पालिकेने पारदर्शक धोरण राबवणे आवश्‍यक आहे, असे सर्वसामान्यांचे मत आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!