क्‍लोजर डिव्हाईस तंत्रज्ञानाव्दारे ‘कृष्णा’त युवतीला जीवदान; डॉक्टरांची कठीण समस्येवर मात


 

स्थैर्य, कऱ्हाड (जि. सातारा), दि.४ : येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये 25 वर्षीय युवतीच्या हृदयातील अंतरपडद्यावर असणारे मोठे छिद्र क्‍लोजर डिव्हाईस या आधुनिक तंत्रज्ञाने बंद करण्याची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ही शस्त्रक्रिया हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विजयसिंह पाटील यांनी केली. 

या शस्त्रक्रियेबाबत डॉ. पाटील म्हणाले, “मानवी हृदय हे उभ्या-आडव्या अंतरपडद्यामुळे चार कप्प्यात विभागलेले असते. त्यापैकी डाव्या बाजूच्या कप्प्यामधून शुद्ध रक्त वाहते, जे शरीराच्या सर्व भागांत पुरविले जाते. उजव्या बाजूच्या कप्प्यामध्ये अशुद्ध रक्त वाहते, जे शुद्धीकरणासाठी फुफ्फुसांना पोचविले जाते; परंतु काही व्यक्तींना हृदयातील अंतरपडद्यांना जन्मजात छिद्र असते. त्यामुळे शुद्ध-अशुद्ध रक्त एकमेकांत मिसळते. अशा व्यक्तींना दम लागणे, वारंवार जंतुसंसर्ग होणे, मेंदू व शरीराची वाढ कमी होणे आदी समस्या उद्भवतात. अशा जन्मजात दोष असणाऱ्या व्यक्तींवर ओपन हार्ट सर्जरी हा एकमेव पर्याय होता. 

सध्या कमी खर्चाची क्‍लोजर डिव्हाईस ही नवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया पद्धती विकसित झाली आहे. त्याद्वारे शरीरावर कोणताही मोठा छेद न करता एक कृत्रिम छत्री किंवा चकती वापरून हृदयाच्या अंतरपडद्यावरील छिद्र बंद केले जाते. ज्यामुळे रुग्ण काही वेळात बरा होऊन सर्वसामान्य जीवन व्यतीत करू शकतो. ही शस्त्रक्रिया डॉ. पाटील यांनी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून यशस्वी केली. त्याबद्दल त्यांचे कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, वैद्यकीय संचालक डॉ. क्षीरसागर, मेडिकल ऍडमिनिस्ट्रेटर आर. जी. नानिवडेकर, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. अभिजित शेळके, मेडिसीन विभागाचे डॉ. व्ही. सी. पाटील आदींनी अभिनंदन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!