पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मंगळवारी मतदान, ३ डिसेंबरला निकाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, मुंबई, दि.२९: महाविकास आघाडीबरोबरच
भाजपच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठेच्या झालेल्या पुणे विभाग पदवीधर आणि
शिक्षक मतदारसंघांच्या निवडणूक प्रचाराची रविवारी सांगता झाली. महाविकास
आघाडी आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुण्यात प्रचारसभा घेऊन निवडणुकीत
रंगत आणली असली, तरी मतदारयादीतील गोंधळामुळे मतदानाचा टक्का वाढविण्याचे
आव्हान या पक्षांपुढे आहे. दरम्यान, राज्यातील शिक्षक आणि पदवीधर
मतदारसंघातून विधान परिषदेवर निवडून देण्याच्या जागांसाठी मंगळवार, दि. १
डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि
शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने या निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्णय
घेतल्यामुळे भाजपनेही ताकद पणाला लावली आहे. प्रचाराच्या काळात एकमेकांवर
वैयक्तिक टीकाही करण्यात आली. या निवडणुकांनंतर राज्यात महापालिका आणि
जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे पदवीधर आणि शिक्षक
मतदारसंघांच्या निवडणुकांना महत्त्व आले आहे. दोन्ही मतदारसंघांमध्ये पुणे
जिल्ह्यात सर्वाधिक मतदार आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी प्रचारासाठी
पुण्यावर लक्ष केंद्रित आहे.

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार
संग्राम देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड आणि जनता दल सेक्युलरचे
माजी आमदार शरद पाटील हे तिन्ही उमेदवार सांगलीतील आहेत. त्यामुळे
सांगलीतील मतांची विभागणी होणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे उमेदवारांची
मदार पुण्यावर अवलंबून आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (मनसे) निवडणुकीत
उतरली असल्याने या मतदारसंघात चौरंगी लढत आहे. मनसेच्या रूपाली पाटील
ठोंबरे या उमेदवार आहेत.

शिक्षक मतदारसंघामध्येही चुरस निर्माण
झाली आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार दत्तात्रय सावंत आणि भाजप
पुरस्कृत उमेदवार जितेंद्र पवार सोलापूरमधील आहेत. काँग्रेसचे उमेदवार जयंत
आसगावकर कोल्हापूरचे आहेत. मनसेचे विद्यानंद मानकर पुण्यातील आहे.
त्याचबरोबर अपक्ष उमेदवार संतोष फाजगे पुण्यामधील उमेदवार आहेत. त्यामुळे
या मतदारसंघात पाच प्रमुख उमेदवारांमध्ये लढत आहे. पुण्यातील ३२ हजार २०१
शिक्षक मतदार या मतदारसंघाचा निकाल ठरविणार आहेत.

भाजपचा गड राखण्यासाठी फडणवीस मैदानात

सुमारे पाच दशकापासून नागपूर विभाग पदवीधर
मतदारसंघ भाजपकडे आहे. भाजपचा हा पारंपरिक गढ राखण्यासाठी भाजप नेते व
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: मैदानात उतरले. या निवडणुकीत
पक्षाने उमेदवार उमेदवार बदलल्याने निर्माण झालेल्या नाराजीचा कुठलाही फटका
बसू नये म्हणून त्यांनी स्वत: मोर्चेबांधणी केली आहे. यावेळी भाजपने
विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांच्याऐवजी फडणवीस यांचे निकटवर्तीय संदीप
जोशी यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सुरूवातीला पक्षातच थोडे
नाराजीचे सूर उमटले होते. त्यामुळे फडणवीस यांनी स्वत: या निवडणुकीची
सुत्रे आपल्या हाती घेतली. यापूर्वी भाजपने या मतदारसंघात इतकी मेहनत कधीच
घेतली नाही.

या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार अभिजित
वंजारी यांना आमदार कपिल पाटील यांच्या शिक्षक लोक भारतीने अटींवर समर्थन
जाहीर केले. या समर्थनाच्या बदल्यात काँग्रेसने २०२३ च्या शिक्षक
मतदारसंघाच्या निवडणुकीत मदत करावी, अशी ही अट आहे व ती काँग्रेसने मान्य
केली आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवार

पुणे पदवीधर – अरुण लाड
(राष्ट्रवादी काँग्रेस), संग्रामसिंह देशमुख (भाजप), प्रताप माने
राष्ट्रवादी काँग्रेस बंडखोर, रुपाली पाटील (मनसे), शरद पाटील (जनता दल),
सोमनाथ साळुंखे (वंचित बहुजन आघाडी), श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक), डॉ.
अमोल पवार (आम आदमी पक्ष), अभिजित बिचुकले (अपक्ष).

औरंगाबाद पदवीधर – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी), शिरीष बोराळकर (भाजप), नागोरराव पांचाळ (वंचित), रमेश पोकळे (भाजप बंडखोर).

नागपूर पदवीधर – अभिजीत वंजारी (काँग्रेस), संदीप जोशी (भाजप), नितीन रोंघे (विदर्भवादी उमेदवार), राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी).

पुणे शिक्षक – जयंत आसनगावकर (काँग्रेस), दत्तात्रय सावंत (अपक्ष), सम्राट शिंदे (वंचित), डॉ.सुभाष जाधव (एमफुक्टो).

अमरावती शिक्षक –
श्रीकांत देशपांडे (शिक्षक आघाडी – मविआ पाठिंबा), नितीन धांडे (भाजप),
दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती), संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती),
प्रकाश काळबांडे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ).


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!