फलटण : तालुक्यात पुन्हा रणधुमाळी – १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार


थेट सरपंच पदासाठी मोठी चुरस पाहायला मिळणार असून, तालुक्यात पुन्हा एकदा ‘खासदार गट’ विरुद्ध ‘राजे गट’ असा सत्तेचा महासंग्राम रंगणार आहे. सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रमही जाहीर झाला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 27 मे : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा धुरळा शांत झाल्यानंतर आता फलटण तालुक्याच्या ग्रामीण राजकारणात पुन्हा एकदा एका मोठ्या ‘महासंग्रामाची’ ठिणगी पडली आहे. फलटण तालुक्यातील एकूण १३१ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १०२ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बिगुल येत्या काही दिवसांत वाजणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा सदस्य पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम नुकताच जाहीर करण्यात आला आहे.

‘खासदार गट’ विरुद्ध ‘राजे गट’ संघर्ष

तालुक्यातील बहुतांश मोठ्या आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या गावांचा या निवडणुकीत समावेश आहे. यामध्ये माहे जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या, तसेच यापूर्वी मुदत संपून प्रशासकराज असलेल्या गावांचा समावेश आहे. ‘थेट सरपंच’ निवडीमुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, गावागावांत आतापासूनच मोर्चेबांधणीला वेग आला आहे. त्यामुळे तालुक्यात पुन्हा एकदा ‘खासदार गट’ (रणजितसिंह नाईक निंबाळकर) विरुद्ध ‘राजे गट’ (रामराजे नाईक निंबाळकर) असा सत्तेचा अटीतटीचा आणि प्रतिष्ठेचा सामना पाहायला मिळणार आहे.

आरक्षण सोडतीचा कार्यक्रम

  • ०८ जून (सोमवार): आरक्षण सोडत काढण्याकरिता विशेष ग्रामसभेची सूचना/नोटीस देणे.

  • १२ जून (शुक्रवार): तहसीलदार किंवा प्राधिकृत अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा बोलावून आरक्षणाची सोडत काढणे (अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि महिला आरक्षण).

  • १९ जून (शुक्रवार): प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करणे.

  • १९ ते २५ जून: प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत नागरिकांना हरकती व सूचना दाखल करण्यासाठी मुदत.

  • ०३ जुलै (शुक्रवार): प्राप्त हरकतींवर उपविभागीय अधिकाऱ्यांनी अभिप्राय देणे.

  • ०८ जुलै (बुधवार): उपविभागीय अधिकाऱ्यांचे अभिप्राय विचारात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम अधिसूचनेस मान्यता देणे.

  • १० जुलै (शुक्रवार): जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलेल्या अंतिम प्रभाग रचनेची आणि आरक्षणाची व्यापक प्रसिद्धी करणे.

‘या’ १०२ ग्रामपंचायतींचा आखाडा तापणार

या निवडणुकांमध्ये कोळकी, साखरवाडी, गुणवरे, तरडगाव, आसू, होळ यांसारख्या मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश असल्याने तालुक्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.

२२ फेब्रुवारी २०२६ रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचायती:

साखरवाडी, तांबवे, कोळकी, पिराचीवाडी, खुंटे, भिलकटी, जाधववाडी (फ), अलगुडेवाडी, सोनवडी खु., तिरकवाडी, सासकल, डोंबाळवाडी, शेरेशिंदेवाडी, सस्तेवाडी, घाडगेवाडी, कापडगाव, निरगुडी, रावडी बु., वाघोशी, जिंती, कापशी, धुमाळवाडी, मुळीकवाडी, काशिदवाडी, फरांदवाडी, घाडगेमळा, कुरवली बु., शिंदेनगर, ठाकुरकी, नांदल, सरडे, सांगवी, राजुरी, तावडी, जावली, खामगाव, हिंगणगाव, मुंजवडी, साठे, खराडेवाडी.

२३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुदत संपलेल्या ग्रामपंचायती:

मलवडी, तडवळे, विंचुर्णी, वडगाव, निंबळक, मिरढे, कोरेगाव, मुरुम, शेरेचीवाडी ढ., भाडळी बु., भाडळी खु., टाकळवाडे, ढवळ, आंदरूड, रावडी खु., आरडगाव, शिंदेवाडी, नाईकबोमवाडी, कांबळेश्वर, धुळदेव, निंभोरे, काळज, बीबी, हणमंतवाडी, बोडकेवाडी, होळ, सोनगाव, वडजल, फडतरवाडी, आळजापूर, राजाळे, गुणवरे, वाखरी, सोनवडी बु., ढवळेवाडी नि., झिरपवाडी, पवारवाडी, शेरेचीवाडी (हिं), को-हाळे, जाधववाडी (ता.).

प्रशासक असलेल्या व मुदत संपलेल्या ग्रामपंचायती:

तरडगाव, खडकी, गोखळी, माळेवाडी, चांभारवाडी, दालवडी, विठ्ठलवाडी, शिंदेमाळ, सासवड, टाकुबाईचीवाडी, ढवळेवाडी (आसू), मिरगाव, मिऱ्याचीवाडी (दा.), आसू, खटकेवस्ती, ऊळुंब, माझेरी, गोळेवाडी, परहर खु., जोर पुन. (वाखरी), गोळेगाव पु. (ठाकुरकी), जोर पुन. (कुरवली खु).


Back to top button
Don`t copy text!