एकलव्याचा कपटाने अंगठा कापला गेला, त्याच परिस्थितीला आजही आदिवासी बांधवांना सामोरे जावं लागतय – उत्तमराव खोब्रागडे


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । मुंबई ।  “आदीकाळापासून मनुवादी व्यवस्थेने भिनवलेल्या जातीपातीच्या विषारी डंखाची तीव्रता अजूनही कमी झालेली नाही, तत्कालीन भिल्ल म्हणजेच आदिवासी समाजातील एकलव्याला शिक्षक, शाळा, शिकवणी किंवा कोणत्याही प्रकारची शैक्षणिक सुविधा नसताना ही केवळ परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्याने धनुर्विद्येत नैपुण्य प्राप्त केले परंतू कपटाने गुरुदक्षिणेच्या नावाखाली त्याचा अंगठाच कापून घेतला गेला; त्याच परिस्थितीला आजही आदिवासी बांधवांना सामोरे जावे लागत आहे, सरकारने कागदोपत्री आदिवासी बालविकास व कल्याणाच्या नावाखाली आदिवासी आश्रमशाळांकरता अनेकविध योजना राबविल्या असल्या तरी मी नागपूर येथे पदभार सांभाळला असता केलेल्या सर्व्ह मध्ये माझ्या निदर्शनास आलं की आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना एकवेळचे जेवण ही भेटत नाही, विद्यार्थ्यांना शौच व स्नानगृह या आवश्यक गरजाही न पुरवल्याने आदिवासी मुला-मुलींना उघड्यावरच सर्व विधी करावे लागत आहे, म्हणजेच कागदोपत्री असलेला निधी लुबाडला जातोय हे लक्षात आल्याने मी एका दिवसात आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि आदिवासी बांधवांना न्याय देण्यासाठी लढा उभा केला तेव्हा आपल्याच अधिकाऱ्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझी बदली केली, बंधूंनो ज्याच्या बापाला परदेशात उच्चशिक्षणासाठी बाबासाहेबांनी पाठवलं त्यानेच आंबेडकर भवन पाडलं, तुम्ही जर IAS अधिकारी झालात तर आंबेडकर भवन पाडण्यासाठी होऊ नका तर ते नव्याने बांधण्यासाठी व्हा, आणि सर्वसामान्य नागरिकांना घटनेचा माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहा, आज तुम्ही गुणवंत यादीत आलात म्हणून समाजाने तुमचा सन्मान केलाय तेव्हा समाजाचे तुम्ही देणे लागता हे विसरू नका” असे प्रतिपादन उत्तमराव खोब्रागडे (IAS अधिकारी) यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सन्मान समारंभात केले.

बौद्धजन पंचायत समिती संलग्न शिक्षण समिती यांच्या विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह येथे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला होता, सदर कार्यक्रमास उत्तमराव खोब्रागडे व त्यांच्या सुविद्य पत्नी मंदाताई खोब्रागडे उपस्थित होत्या, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बौद्धजन पंचायत समितीचे सरचिटणीस राजेश घाडगे यांनी केले तर प्रास्ताविक शिक्षण समितीच्या राजेश पवार यांनी केले, सदर कार्यक्रमास उपसभापती विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मणजी भगत, माजी कार्याध्यक्ष किशोरजी मोरे, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच.आर.पवार, मनोहर मोरे, कोषाध्यक्ष नागसेन गमरे, संस्कार समिती अध्यक्ष मंगेश पवार, रमेश जाधव, साहित्य कला-क्रीडा समिती अध्यक्ष राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे तसेच व्यवस्थापन मंडळ, उपसमित्यांचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते, जवळपास ३००-३५० माध्यमिक, उच्चमाध्यमिक, पदवी, पदविकाधर, विद्यावाचस्पती (डॉक्टरेट) या गुणवंत विद्यार्थ्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. त्यासोबतच क्रीडा क्षेत्रातून भारतीय कॅरम संघात स्थानप्राप्त झालेली निलम भीमराव घोडके जी ३० ऑक्टोबर रोजी मलेशिया येथे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे, त्यासोबतच सुवर्ण पदक विजेते भारतीय ऋषीराज रवींद्र कदम (वेट लिफ्टिंग), दिशा दीपक तांबे (नॅशनल हॉकी), तनिष तांबे (किक बॉक्सिंग), भूमी अरविंद साळवी (रायफल शूटिंग), कार्तिकी किशोर साळवी (राज्यस्तरीय कराटे) यांचा ही सन्मान करण्यात आला.

सदर प्रसंगी अध्यक्षीय भाषणात “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, ते मी माझ्या बछड्यांना पाजतोय, ही पिल्लं पुढे जाऊन अन्याय, अत्याचाराचा निकराने विरोध करतील, बाबासाहेबांचा हाच वैचारिक वारसा पुढे नेत ही नवीन पिढी उदयास येत आहे, त्याकाळी शिक्षणाचा अधिकार नसल्याने बाबासाहेबांनाही शाळे बाहेर उभं राहून शिक्षण घ्यावं लागलं, क्रांतिवीर महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सर्वांसाठी उपलब्ध केलेल्या शिक्षणव्यस्थेचा पाया घातला तर त्यावर कळस बाबासाहेबांनी चढवला म्हणूनच आज आपण इथवर आलो आहोत, आपण सर्वांनी आपापल्या क्षेत्रात भरारी घेऊन समाज कार्यात आपले योगदान द्यावे” असे प्रतिपादन अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी अध्यक्षीय भाषणात केले.

सदर कार्यक्रमास पालक, पाल्य व सर्वच स्तरातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता, शिक्षण समितीने नियोजित पद्धतीने कार्यक्रमाची आखणी करून तो यशस्वीरीत्या संपन्न केला त्यासाठी राजेश पवार तसेच माजी अध्यक्ष तुळशीराम शिर्के व सर्वच पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले, त्या सर्वांचे सरतेशेवटी अशोक मोहिते यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रमाची सांगता केली.


Back to top button
Don`t copy text!