ग्रामपंचायत निवडणुकांसाठी भाजपशी आघाडी नकाे, राज्यातील सर्व जिल्हाप्रमुखांना शिवसेना पक्षप्रमुखांचे आदेश


 

स्थैर्य, मुंबई, दि.१९: राज्यात १५ जानेवारीला १४
हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. त्यासाठी
शिवसेनेने ‘महाविकास आघाडीसह नव्हे स्वबळावर, हा नारा दिला आहे. कुठल्याही
परिस्थितीत भाजपच्या लोकांशी हातमिळवणी करू नका, असे आदेश राज्यातील सर्व
जिल्हाप्रमुखांना दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी
गुरुवारी रात्री शिवसेनेच्या सर्व जिल्हाप्रमुखांची वर्षा निवासस्थानी बैठक
घेतली.

ग्रामपंचायत
निवडणुकीत तुम्हाला काँग्रेस तसेच राष्ट्रवादीशी आघाडी करायची असल्यास करा
किंवा अडचण असल्यास करू नका. तो सर्वस्वी निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून
घ्या, पण काहीही झाले तरी भाजपच्या मंडळींबरोबर आपण जायचे नाही, असा आदेश
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे पक्षातील सूत्रांनी
सांगितले. बैठकीत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, वर्षभरात आपण शेतकरी
कर्जमाफी, चक्रीवादळातील मदत, कोरोनावर नियंत्रण अशी चांगली कामे केली
आहेत. शिवसेना प्रत्यक्ष सत्तेत आहे. मुख्यमंत्रिपद आपल्याकडे आहे. याचा
लाभ उठवा आणि ग्रामपंचायतींवर भगवा फडकवा. राज्यात २८ हजार ग्रामपंचायती
आहेत. त्यातील निम्म्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका आता होत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था आघाडीने?

१०
मनपा व २७ जिल्हा परिषदांच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये निवडणुका होत आहेत.
त्या महाविकास आघाडी एकत्र लढण्याची दाट शक्यता आहे. मात्र,
ग्रामपंचायतींच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार, असे काही नियोजन
नाही. त्यामुळे शिवसेनेने आघाडीचा निर्णय सर्वस्वी स्थानिक नेतृत्वावर
सोडला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!