महाबळेश्वर आगारात आठ दिवसांपासून डिझेल टंचाई; एसटीचे वेळापत्रक बिघडले


 


स्थैर्य, भिलार, दि.१९: सातारा विभागात उत्पन्नात व
भारमानात आघाडीवर असलेल्या महाबळेश्वर आगारात गेल्या आठ दिवसांपासून
डिझेलचा तुटवडा असल्याने प्रवासी, कामगारांना विनाकारण मनस्ताप सहन करावा
लागतो आहे. इतर आगारांतही पुरेसे डिझेल उपलब्ध होत नसल्यामुळे आगाराचे
वेळापत्रक पुरते बिघडले आहे. 

महाबळेश्वर आगारातील डिझेल गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे संपलेले आहे.
त्यामुळे आगाराला डिझेलसाठी इतर आगारांवर अवलंबून राहावे लागत आहे. डिझेल
नसल्याने इतर आगारांत इंधन भरण्यासाठी गाडी जात असल्यामुळे वेळापत्रक
विस्कळित होत आहे. मुंबईला जाताना तीन ते चार आगारांत बस इंधन भरण्यासाठी
न्यावी लागते. यामुळे अंदाजे तासभर गाडी उशिरा धावते. याचा फटका प्रवाशांना
बसतो आहे. वास्तविक महाबळेश्वर आगार उत्पन्न व भारमानात सातारा विभागात
आघाडीवर असताना आगाराला इंधन वेळेवर का उपलब्ध होत नाही? याबाबत वरिष्ठ
कार्यालयाने दखल घेणे आवश्‍यक आहे. 

महाबळेश्वर हे राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटकांची
नेहमी वर्दळ असते. आगाराच्या लांब पल्ल्याच्या गाड्याही चांगल्या उत्पन्न
आणतात, असे असतानादेखील आगारात इंधन नसल्याने आगाराच्या वेळापत्रकावर याचा
परिणाम झाला असून, डिझेल नसल्याने गाड्या उशिरा धावत आहेत. अगोदरच
महाबळेश्वर तालुका दुर्गम व डोंगराळ असून, गाड्या उशिरा धावत असल्यामुळे
सर्वसामान्य प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. महाबळेश्वर
आगारातील ग्रामीण मुक्कामी गाड्या बंद असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन
करावा लागतो आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महाबळेश्वर आगाराचा इंधन पुरवठा
तातडीने पूर्ववत करावा, तसेच ग्रामीण मुक्काम तातडीने सुरू करावेत, अशी
मागणी तालुक्‍यातील नागरिक व प्रवासी करत आहेत. 

इंधनाचा प्रश्न हा सर्व महाराष्ट्रात निर्माण झाला असून, त्याचा फटका
महाबळेश्‍वर आगारालाही बसला आहे; परंतु असे असले तरी आम्ही गाड्या वेळेवर
सोडत असून, या समस्येची झळ प्रवाशांना बसू नये, यासाठी आम्ही इतर
ठिकाणांहून इंधन उपलब्ध केले आहे. वरिष्ठ पातळीवरून इंधनाचा प्रश्न
मिटल्यावर वेळापत्रक सुरळीत होईल, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 


-नामदेव पतंगे, आगारप्रमुख, महाबळेश्‍वर 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!