बापाचे वय होते, तेव्हा बापाला विसरायचे नसते – लखन नंदकुमार मोरे


दैनिक स्थैर्य | दि. ३० एप्रिल २०२४ | फलटण |
ज्यावेळी आपल्या बापाचे वय होते, तेव्हा आपल्या बापाला खरा आधार देण्याची वेळ येते, मध्येच आपल्या बापाला विसरायचे नसते, असे प्रतिपादन फलटण तालुक्यातील शरद पवार यांचे निष्ठावंत नंदकुमार संभाजी मोरे यांचे सूपुत्र लखन नंदकुमार मोरे यांनी केले आहे.

जेव्हा सगळ्यांनी साथ सोडली, तेव्हा फलटण तालुक्यातील ज्येष्ठ नेते कै. सुभाषराव (भाऊ) शिंदे, एक दलित कुटुंबातील नि:स्वार्थी व निष्ठावंत व्यक्तिमत्व नंदकुमार संभाजी मोरे व तालुक्यातील पवारसाहेब प्रेमी हे पवार साहेबांसोबत भक्कम पणे उभे राहिले आहेत.

जेव्हा आदरणीय पवारसाहेब या गद्दारीच्या घटनेनंतर सर्वात प्रथम फलटण तालुक्यात आले, तेव्हा त्यांचे जल्लोषात स्वागत या दोघांनी पूर्ण नियोजन करून महाविकास आघाडीची मोट बांधून तालुक्यातील सर्वच साहेबप्रेमी जनतेच्या सोबत अगदी उत्साहात व जल्लोषात केले.

संपूर्ण फलटण तालुका पिंजून काढत साहेबांचे विचार व साहेबांची नवीन निशाणी ‘तुतारी’ वाजविणारा माणूस हे सर्वांपर्यंत पोहोचवले, मात्र नियतीने घात केला. कै. सुभाषभाऊ व नंदकुमार मोरे यांनी एकनिष्ठ राहून काही सहकारी यांच्या माध्यमातून पवारसाहेब यांचा विचार व वारूळ जिवंत ठेवले होते. मात्र, काही मंडळींकडून अचानक पवारसाहेब यांचे काही मुख्य शिलेदार राजकीयदृष्ट्या सक्षम होतील म्हणून काही रंग बदलणारे सरडे वारूळावर कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, कट्टर समर्थक व पवारसाहेब प्रेमी त्यांचे मनसुबे उद्ध्वस्त करतील हे निश्चित, असे लखन मोरे यांनी सांगितले.

दरम्यान, आता तालुक्यातील परिस्थिती खूपच बदलली आहे. स्वतःचे गड राखण्यासाठी व पुढची पिढी ‘सेटल’ करण्यासाठी आता साहेबांची गरज सगळ्यांनाच वाटायला लागली आहे. अगदी सोशल मीडियावर व इतर काही ठिकाणी त्यांच्या विचारांशी अप्रामाणिकपणे राहिलेल्या लोकांना पण आता साहेब दिसायला लागलेत.

ज्यावेळी साहेबांसोबत तालुक्यामध्ये कोणी नव्हते, तेव्हा हे दोघे साहेबांच्या संपर्कामध्ये राहून साहेबांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवण्याचे खरं काम या दोघांनी केले, पण सत्य परिस्थिती ही लोकांनासुध्दा सांगितली पाहिजे. मला तेवढे सांगायचे राजकारण करावे, पण जातीपातीचे, लहान-मोठा असे राजकारण करू नका, असे मोरे म्हणाले.

मला कुणाचेही मन दुखवायचे नाही, पण सत्य भूमिका माझ्यामार्फत मांडलेली आहे. कारण ज्यावेळेस साहेबांसोबत कोण नव्हतं, साहेबांना आधाराची खरी गरज होती, त्यावेळेस मी माझ्या वडिलांसोबत साहेबांना दोन-तीनदा भेटलेलो आहे, त्या भेटीत मी काही गोष्टी साहेबांच्या तोंडातून ऐकलेल्या आहेत. त्यामुळे मला जे वाटलं, ते मी लिहिलं आहे!, असेही मोरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

फलटण तालुक्यातील शोषित, वंचित, दुर्लक्षित, उपेक्षित कार्यकर्ता यांना मानसन्मान, न्याय व हक्क मिळावा म्हणून माढा लोकसभेकरीता बंडखोरी केली असावी, असे मला वाटत आहे. फलटण तालुक्यात सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यामुळेच आज कार्यकर्ता व मतदार ‘चार्ज’ झाला आहे, असे मोरे यांनी सांगितले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या महोत्सवात सर्वांनी सहभाग दाखवून मतदान करावे, असे आवाहनही शेवटी लखन नंदकुमार मोरे यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!