
स्थैर्य, सातारा, दि. १२ जून : गोडोली तळ्याच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यामुळे हा परिसर लवकरच ‘शंभूतीर्थ’ म्हणून ओळखला जाणार आहे. स्वराज्यासाठी प्राणार्पण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतीला साजेसा सन्मान मिळावा आणि या ऐतिहासिक स्थळाचे पावित्र्य अबाधित राहावे, यासाठी हा संपूर्ण परिसर बॅनरमुक्त आणि हॉकर्समुक्त करण्याची आग्रही मागणी नगरसेवक रवी पवार यांनी केली आहे.
गोडोली येथील जकात नाक्यालगत असलेल्या तळ्याच्या परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, सातारा पालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते आणि मुख्याधिकारी विनोद जळक यांना दिलेल्या निवेदनात रवी पवार यांनी या परिसराला विशेष संरक्षण देण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
निवेदनातील प्रमुख मुद्दे:
-
ऐतिहासिक ओळख: इतिहासाचा साक्षीदार असलेल्या गोडोली गावाला शंभूतीर्थाच्या माध्यमातून एक नवी व प्रेरणादायी ओळख मिळणार आहे. भविष्यात हजारो शिवप्रेमी, पर्यटक आणि नागरिक येथे दर्शनासाठी येतील.
-
पावित्र्य राखणे: अशा पवित्र ठिकाणी व्यावसायिक जाहिरातींचे होर्डिंग्ज, बॅनर्स किंवा अनधिकृत टपऱ्यांची गर्दी दिसणे हे या स्मारकाच्या गौरवाला शोभणारे नाही.
-
शिस्तबद्ध वातावरण: छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन हे त्याग, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे. त्यामुळे त्यांच्या स्मृतीस्थळाभोवती स्वच्छ, सुशोभित आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण होणे ही काळाची गरज असल्याचे मत नागरिकांतून व्यक्त होत आहे.
शंभूतीर्थ परिसरात प्रवेश करताच प्रत्येकाला इतिहासाचा अभिमान आणि महाराजांच्या कार्याचा वारसा जाणवावा. त्यामुळे गोडोली तळ्याच्या परिसरातील जाहिरातींच्या फ्रेम तातडीने हटवून हा संपूर्ण भाग ‘नो बॅनर झोन’ आणि ‘नो हॉकर्स झोन’ म्हणून घोषित करावा, अशी मागणी रवी पवार यांनी प्रशासनाकडे केली आहे. शंभूतीर्थाची ओळख केवळ स्मारकापुरती मर्यादित न राहता स्वच्छता, शिस्त आणि ऐतिहासिक जतनाचा आदर्श निर्माण करणारी ठरावी, अशी भावना शिवप्रेमींमधून व्यक्त होत आहे.