
स्थैर्य, सातारा, दि. १२ जून : सातारा शहरालगतच्या गोडोली परिसरातील वाहतूक कोंडी आणि पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होण्याच्या समस्या लक्षात घेऊन आता येथील दोन पुलांची उंची वाढवण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत संबंधित विभागाला तातडीने लेखी सूचना दिल्याची माहिती स्थानिक नगरसेवक रवी पवार यांनी दिली आहे.
कोणत्या पुलांची उंची वाढणार?
-
गोडोली परिसरातील चारु सपकाळ यांच्या घरासमोरील पूल.
-
पालवी हॉटेल आणि खांडोळी हॉटेल दरम्यान असलेला पूल.
कामाचे फायदे:
या दोन्ही पुलांची उंची वाढवण्यात येणार असल्यामुळे परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. तसेच, पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना आणि वाहनधारकांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो, त्या अडचणीही या कामामुळे दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
गोडोली परिसरातील विकासकामांसाठी मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे सातत्याने सकारात्मक भूमिका घेत असून, नागरिकांच्या मागण्यांनुसार विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात, असे रवी पवार यांनी आवर्जून सांगितले. पुलांच्या या उंचीवाढीच्या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे.
