श्री क्षेत्र पैठण मार्फत वारकर्‍यांना मोफत चहा व पाण्याची सेवा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. २२ जून २०२३ | फलटण |
संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणार्‍या वारकर्‍यांना श्री क्षेत्र पैठण मार्फत मागील २३ वर्षांपासून अ‍ॅड. फटांगडे मामा यांचेमार्फत मोफत चहा, पाणी व बिस्कीट सेवा पुरवली जात आहे.

२३ वर्षापूर्वी अ‍ॅड. किसनराव फटांगडे मामा हे स्वतः संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यासोबत आळंदी ते पंढरपूर पायी वारी करत असताना त्यांनी अनुभवले की, लाखो वारकर्‍यांना पाऊस व ऊन, वारा व अशुद्ध पाण्यामुळे सर्दी, पडसे, खोकला, अंगदुखी, ताप यासारखे आजार होऊन पायी वारी अर्ध्यातच सोडावी लागते. यावर उपाय म्हणून त्यांना कल्पना सूचली की, आपण वारकर्‍यांना सूंठ, दालचिनी, विलायची, जायफळ, मिरी वापरून केलेला आयुर्वेदीक चहा द्यावा व शुध्द पिण्याचे पाणी दिले तर वारकर्‍यांना त्याचा फायदा होईल व वारी अर्ध्यातच सोडण्याची वेळ येणार नाही. या कल्पनेचे रूपांतर अ‍ॅड. फटांगडे मामा यांनी सत्यात उतरवून मागील २३ वर्षांपासून ही सेवा निरंतर आजतागायत सुरू आहे.

या सेवेसाठी साखर १० क्विंटल, चहापत्ती २५ किलो, दूध ५०० लिटर (अमोल गोल्ड टेट्रा), सूंठ ३ किलो, दालचिनी १ किलो, विलायची १ किलो, जायफळ १ किलो, मिरी १ किलो, बिस्कीट ३५ खोके, गॅस टाकी १३, एक पाणी टँकर, एक ट्रक, १८ पुरूष सेवेकरी व ३ महिला सेवेकरी अशा संचासह संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी वारी करणार्‍या वारकर्‍यांना श्री क्षेत्र पैठणमार्फत मागील २३ वर्षांपासून मोफत आयुर्वेदिक चहा, पाणी व बिस्कीट सेवा पुरवली जात आहे.

रोज साधारण ८ ते १० हजार कप चहा वारकर्‍यांना मोफत दिला जातो. पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध करून दिले जाते. ही सेवा सतत १५ दिवस दिली जाते व सदर उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत असून वारकरी आवर्जून व शिस्तीत रांगेत येऊन नाथ महाराजांचा प्रसाद समजून ही सेवा स्वीकारत आहेत.

२१ सेवेकरी कोणताही मोबदला न घेता सेवाभावातून ही सेवा पुरविण्यासाठी श्रमदानातून मदत करतात. या सेवेकर्‍यांमध्ये प्रामुख्याने ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती पैठण दशरथ खराद, जिजाभाऊ मिसाळ, सेवानिवृत्त शिक्षक नामदेव गवळी, प्रगतशील शेतकरी पांडुरंग औटे (आपेगांव), ट्रकचालक मीयाभाई सय्यद, कैलास परदेशी, व्यापारी हरीभाऊ तुपे, विजय सारडा, शिवाजी सारडा, पाणी टँकरचालक आप्पासाहेब दळवे, किशोर भुजबळ, कृष्णा गरड, मच्छींद्र गलधर, विजय परदेशी, संजय जाधव, दिगंबर कणसे, संतोष आप्पा ढेरे, मच्छिंद्र गोरे तसेच महिला सेवेकरी गोदाबाई जामदार, कुसूमबाई एरंडे, शकुंतला जाधव यांचा समावेश आहे.

या उपक्रमासाठी जे सेवेकरी आहेत ते शासकीय नोकर, व्यापारी, प्रगतशील शेतकरी, शेतमजूर आहेत. हे सर्वजण प्रतिवर्षी १५ दिवस सुट्टी टाकून, व्यापार सोडून, मजुरी बुडवून निष्काम सेवा करत आहेत. विशेष म्हणजे या अभिनव उपक्रमास लागणारा सर्व खर्च अ‍ॅड. किसनराव फटांगडे मामा हे स्वतः करतात.

या उपक्रमास राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री ना. संदीपान पाटील भुमरे यांनी फलटण मुक्कामी सदिच्छा भेट दिली व मागील २३ वर्षांपासून चालू असलेल्या उपक्रमाची प्रशंसा केली व अभिनव उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी शिवसेना फलटण तालुकाप्रमुख नानासाहेब इवरे, संत एकनाथ महाराज देवस्थान ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, माजी नगरसेवक पैठण शहादेव लोहारे, मोफत चहा वाटप दिंडीचालक व मालक अ‍ॅड. किसनराव फटांगडे यांच्यासह सेवेकरी दशरथ खराद, ग्रामविकास अधिकारी पंचायत समिती पैठण जिजाभाऊ मिसाळ, सेवानिवृत्त शिक्षक नामदेव गवळी यांच्यासह स्थानिक अधिकारी व पदाधिकारी, संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळा समिती सदस्य, चोपदार व वारकर्‍यांनी भेट देऊन मोफत चहा व पाणी सेवेची प्रशंसा केली.

या सर्व उपक्रमाचे श्रेय स्वत: न घेता, माऊली आमच्याकडून ही सेवा करून घेत आहे, असे मनोगत अ‍ॅड. किसनराव फटांगडे मामा यांनी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!