स्थैर्य, सातारा, दि.२: शहरातील दोन हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्याचा ठपका ठेवून शहर पोलिसांनी दोन हॉटेल मालकावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोवई नाक्यावरील सयाजीराव विद्यालयाच्या शेजारी असलेले सायली हॉटेल दि. ३० रोजी रात्री पावणे अकरापर्यंत सुरू असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली असता हॉटेल सुरू होते. हॉटेल मालक नरसिंह रामा भट्ट (वय ५८) यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला तर विसावा नाका येथील चीलिझा चायनीज हे हॉटेलही रात्री उशिरापर्यंत सुरू होते. याप्रकरणी पोलिसांनी आसिफ गुलाम रसूल सय्यद (वय ५२, रा. राधिका रोड सातारा) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत ुकाने, हॉटेल उघडण्यास जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिली आहे. मात्र असे असतानाही अनेक हॉटेल व्यवसायिक रात्री उशिरापर्यंत हॉटेल सुरू ठेवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येत आहे. त्यामुळे पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.