कोव्हिड-१९ मुळे प्रौढांमध्ये अल्झायमर्सचा धोका वाढला


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२२ । मुंबई । कोव्हिडनंतरच्या जगामध्ये आणखी एका साथीचा धोका मूकपणे उदयाला येत आहे. हा धोका आजघडीला जाणवणारा आणि वास्तव आहे. वयोवृद्ध व्यक्तींमध्ये कोव्हिडच्या संसर्गामुळे अल्झायमर्सचा धोका लक्षणीयरित्या वाढत असल्याचे ताज्या संशोधनांमधून सूचित झाले आहे. जर्नल ऑफ अल्झायमर्स डिसिजमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार कोव्हिडची बाधा झालेल्या वयोवृद्ध व्यक्तींना वर्षभराच्या आत अल्झायमर्सचा आजार जडण्याचा धोका ५०-८०% अधिक आहे. ८५ वर्षे किंवा त्याहून वृद्ध स्त्रियांना या आजाराचा धोका अधिक असल्याचेही या अहवालात म्हटले गेले आहे.

या विषयावर आपले मत व्यक्त करताना पद्मश्री किताबाचे मानकरी, डॉ. बत्राज ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक आणि चेअरमन डॉ. मुकेश बत्रा म्हणाले, “अल्झायमर्स आजाराविषयी बहुतांश लोकांच्या मनात गैरसमज असल्याचे होमियोपॅथीच्या क्षेत्रातील माझ्या ५० वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी पाहिले आहे. हा आजार प्राणघातक असू शकतो पण योग्य वेळी योग्य वैद्यकीय हस्तक्षेप झाल्यास रुग्ण अधिक सुरक्षित राहू शकतो. अल्झायमर्ससाठीचे होमियोपॅथी औषधोपचार हे प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार केले जातात. हा एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे, जो या आजाराच्या मूळ कारणावर उपचार करण्यास मदत करतो. संज्ञानात्मक आरोग्य टिकविण्यासाठी आणि एकूणच तब्येत चांगली राखण्यासाठी होमियोपॅथीखेरीज जीवनशैलीत केलेल्या काही आरोग्यकारक बदलांचीही मदत होऊ शकते.”

अल्झायमर्स ही एक अशी स्थिती आहे जी व्यक्तीच्या विचार करण्याच्या, वागण्याच्या आणि दैनंदिन कामे करण्याच्या क्षमतेवर परिणाम करते. भारतामध्ये ४० लाखांहून अधिक व्यक्तींना अल्झायमर्स असल्याची नोंद झाली आहे आणि जगभरात किमान ४.४ कोटी लोक या आजाराचा सामना करत आहेत. १९०६ साली या आजाराचा शोध लावणा-या डॉ. अलॉइस अल्झायमर्स यांचे नाव या आजाराला देण्यात आले आहे.

अल्झायमर्सची लक्षणे सुरुवातीला सौम्य असतात आणि कालपरत्वे ते अधिकाधिक तीव्र होत जातात. विस्मरण आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी योग्य शब्द आठवायला कष्ट पडणे या स्वरूपात या आजाराची पहिली लक्षणे दिसू लागतात. हा आजार फक्त वयोवृद्ध व्यक्तींनाच होतो असा गैरसमज सर्वत्र दिसून येतो, मात्र युवा-प्रौढ वयोगटातील व्यक्तींनाही हा आजार होऊ शकतो असे आकडेवारीतून दिसून येते. तज्ज्ञांच्या मते जनुकीय घटक, जीवनशैली आणि पर्यावरण अशा अनेक कारणांमुळे अल्झायमर्स होण्याची शक्यता असते.


Back to top button
Don`t copy text!