लहान बाळांना ‘अदृश्य’ श्रवणदोषांपासून वाचवण्यासाठी एको-स्क्रीन चाचणी


दैनिक स्थैर्य । दि. २३ सप्टेंबर २०२२ । मुंबई । जेनवर्क्स या भारतातील आघाडीच्या डिजिटल वैद्यकीय व आरोग्यसेवा सोल्यूशन्स पुरवणाऱ्या कंपनीने लहान बाळांना ‘अदृश्य’ श्रवणदोषांपासून सुरुवातीच्या टप्प्यातच वाचवणारी एको-स्क्रीन चाचणी प्रक्रिया सुरू केली आहे.

अन्य जन्मजात विकलांगतांच्या तुलनेत श्रवणातील विकलांगता ओळखण्यात बहुतेकदा पालकांना अपयश येते. या विकलांगतेच्या निदानास उशीर झाल्यामुळे शब्दभांडार व भाषा यांच्या पायावर परिणाम होतात. मात्र, ऑटोकॉस्टिक एमिशन तंत्रज्ञानावर आधारित इको-स्क्रीनमुळे, इअरफोन्सच्या माध्यमातून कर्णपटलांवर वेगवेगळ्या वारंवारतेचे ध्वनीसंकेत पाठवून लहान बाळाची ऐकण्याची क्षमता तपासता येते. हे यंत्र बाळाने दिलेल्या प्रतिसादांची नोंद करून त्यांचे श्रवणदोषांसाठी मूल्यमापन करते. एको-स्क्रीन चाचणीची संपूर्ण प्रक्रिया दहा मिनिटांहून कमी कालावधीत पूर्ण होते. बाळ झोपलेले असताना शांत व बंदिस्त खोलीत ही चाचणी केली जाते, तेव्हा तिची निष्पत्ती सर्वोत्तम मिळते.

सेतू न्यूबॉर्न केअर सेंटरमधील निओनॅटोलॉजिस्ट व संचालक डॉ. अनुज ग्रोवर दररोज पाच एको-स्क्रीन चाचण्या करतात. ते म्हणाले, “बाळाला नीट ऐकू येत आहे की नाही हे त्याच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही दिवसांत कोणीच सांगू शकत नाही. मात्र, एको-स्क्रीन चाचणीच्या माध्यमातून, लहान बाळ नीट ऐकू शकत आहे की नाही हे आपण बऱ्यापैकी अचूकतेने सांगू शकतो. विश्लेषणानंतर मशिनवर ‘पास’ असा संकेत येत असेल, तर याचा अर्थ बाळ नीट ऐकू शकत आहे, पण त्यावर ‘रेफर’ असा संकेत येत असेल, तर आपल्याला दोनेक आठवड्यानंतर ही चाचणी पुन्हा करणे आवश्यक आहे असा त्याचा अर्थ होतो.”

“लहान मूल विविध ध्वनी ऐकू शकत आहे की नाही सांगणारे हे तंत्रज्ञान महत्त्वाचे आहे. लहान बाळ सहसा मोठ्या आवाजालाच प्रतिसाद देतात, त्यामुळे त्यांना खरोखर नीट ऐकू येत आहे की नाही हे तपासण्यासाठी ही चाचणी करवून घ्या असे आम्ही नेहमीच पालकांना सांगतो. मोठ्या आवाजांना प्रतिसाद देणे व सामान्य आवाजातील संभाषण ऐकू येणे यामध्ये खूप मोठा फरक आहे, हे पालकांना समजू शकत नाही. लहान बाळाला अगदी कुजबुजही ऐकू आली पाहिजे,” असे डॉ. ग्रोवर म्हणाले.

जेनवर्क्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. गणेश प्रसाद म्हणाले, “श्रवण हे नवजात अर्भकाच्या वाणी व मेंदूच्‍या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. श्रवणाची तपासणी हा मूल्यांकनाचा पायाभूत व निर्णायक नियम आहे. विशेषत: दिवस भरण्यापूर्वी जन्माला आलेल्या मुलांसाठी हे आवश्यक आहे. नवजात बालकांची काळजी घेणे तंत्रज्ञानामुळे अधिक सोपे झाले आहे. जेनवर्क्समध्ये आम्ही क्लिनिकल केअर क्षेत्रातील सर्वोत्तम सोल्यूशन्स आणतो आणि एको-स्क्रीन हे नवजात बाळांच्या तपासणीसाठी गुणवत्ता सिद्ध केलेले तंत्रज्ञान आहे. हे वापरण्यासाठी अत्यंत सोपे आहे आणि नवजात बाळाची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून ही चाचणी अचूक निष्पत्ती देते.’’

संयुक्त राष्ट्रांच्या आरोग्य यंत्रणेच्या अंदाजानुसार, दर १,००० अर्भकांपैकी पाच अर्भकांमध्ये गंभीर स्वरूपाचे श्रवणदोष असतात. भारतात जन्माला येणाऱ्या अर्भकांपैकी दरवर्षी २७,००० अर्भके श्रवणदोषासह जन्माला येतात.


Back to top button
Don`t copy text!