दैनिक स्थैर्य | दि. ४ मे २०२४ | फलटण |
१९९१ पासून आजपर्यंत दिलेला शब्द व काम कार्यपूर्तीस घेऊन जाणारे सातारा जिल्ह्याचे ‘जलनायक’ म्हणून ज्यांची पूर्ण महाराष्ट्रभर ओळख आहे, असे विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे परिपूर्ण विकासाचे राजकारण करत असताना आपल्या कामाची पोचपावती जनता त्यांना आपल्या मतपेटीतून देते, हे टीका करणार्यांनी लक्षात ठेवा व मगच टीका करावी, अशी प्रतिक्रिया फलटण शहर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उपाध्यक्ष गौरव नष्टे यांनी दिली.
नष्टे यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे की, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर गेली २८ वर्षे महाराष्ट्रातील राजकारणावर आपला आदर्शवत असा ठसा उमटवला आहे. श्रीमंत रामराजेंचे विरोधकही खासगीत एक चांगला माणूस, चांगला नेता, चांगला राजा असे बोलतात. श्रीमंत रामराजे यांनी पाण्याच्या माध्यमातून फलटण, माण, खंडाळा सुजलम सुफलाम् व्हावा यासाठी ध्यास घेतला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद आणि सुरवडीचे एमआयडीसी असे दोन मोठे प्रकल्प उभे केले. त्यासाठी अनेक उद्योजक, उद्योगपतींशी संधान साधले व तालुक्याचा चेहरामोहराच बदलला.
आज धरणे उभी करताना अगदी भूमिपूजनापासून ते बांध पूर्ण होईपर्यंत धरणग्रस्त, विस्थापितांचे योग्य पुनर्वसन करून प्रश्न सोडविणे आणि संबंधित दुष्काळी भागाला पाणी देणे हे एकाच वेळी करणे कठीणच. पण, श्रीमंत रामराजे यांनी आपल्या विद्वत्तेच्या व कौशल्याच्या जोरावर विकासाची गंगा कायम दुष्काळी भागात भगीरथ प्रयत्न करून पोहोचविली म्हणून त्यांना महाराष्ट्राचे ‘आधुनिक भगिरथ’, असे म्हटले जाते.
फलटण तालुक्यातील जनता, युवा पिढी शिकून सवरून शहाणी व्हावी तसेच जातीभेदाचे निर्मूलन व्हावे, यासाठी श्रीमंत मालोजीराजे यांनी मुधोजी महाविद्यालय उभे केले.
भूतपूर्व अधिपती कै. श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या स्वप्नातील तालुका, जिल्हा पर्यायाने महाराष्ट्र साकार करण्याचे कार्य कै. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या आशिर्वादाने व साक्षीने आणि श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांची चिकित्सक व अभ्यासू वृत्ती तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या सतत वाढत गेलेल्या लोकसंपर्कातून सुरू केलेले राजकीय अभियानास आज तब्बल अडीच दशके झाली आहेत. स्वप्न साकार होत आहे, फळेही येत आहेत आता फक्त ती चाखणे बाकी आहे. हे घडले ते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर या संयमी, कुशल मार्गदर्शन आणि नेतृत्वामुळेच.