वडूज नगरपंचायतीचा स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये राज्यात डंका


 

स्थैर्य, दहिवडी, दि. २१ (डॉ विनोद खाडे) : केंद्र सरकारच्या महत्वकांशी स्वच्छ भारत मिशन व स्वच्छ भारत अभियानांतर्गत तसेच महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय, स्मार्ट सिटी अमृत अभियान, स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी), देशात 4300 शहरांचा सहभाग असणारी, ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत गेली 3 वर्षापासून स्वच्छ सर्वेक्षण लिग राबविण्यात येत आहे. आणि याचाच एक भाग असलेली महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील नवनिर्वाचित वडूज नगरपंचायत वडूज. 

सन 2019 साली पहिल्यांदाच वडूज नगरपंचायत वडूज या स्पर्धेत सहभागी झाली, पहिल्या वर्षात अनुभव व काही तांत्रिक अडचणी असल्याकारणाने स्पर्धेत यश मिळण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या परंतु स्वच्छ सर्वेक्षण 2020 या वर्षात पुन्हा नव्या जोमाने आणि नव्या ताकतीने वडूज नगरपंचायत वडूज कामाला लागली. स्वच्छ सर्वेक्षण 2020 या उपक्रमांतर्गत त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याधिकारी श्री माधव खांडेकर यांनी स्वतः यामध्ये लक्ष घालत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच शहर स्वच्छता समन्वयक हिना इनामदार तसेच नगरपंचायत आरोग्य विभाग व कार्यालय विभाग यांच्या मदतीने कामास सुरुवात केली. जवळपास तीन महिने वडूज शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापनांतर्गत, दररोज घराघरातून निर्माण होणारा कचरा व या कचऱ्याचे योग्य विलगीकरण, कचऱ्याचे योग्य नियोजन अचूक विल्हेवाट, ओला कचरा सुका कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती, दैनंदिन जमा होणाऱ्या कचऱ्या मधून सर्व प्रकारचे प्लास्टिक वेगळे करून त्याची योग्य प्रकारे नियोजन, प्रमुख रस्ते गल्ली बोळ स्वच्छता, सर्व प्रकारच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाय योजना, शहरातील मोठे कचऱ्याचे ढीग बाजूला करून त्या ठिकाणी हरित झाडे लावणे, शहरातील सार्वजनिक ठिकाणी असणारी मुतारी शौचालय तसेच स्वच्छ सुंदर ठेवणे, शहरात पूर्णपणे प्लास्टिक बंदी, स्वच्छता अभियानांतर्गत शहरातील शाळा सर्वजनिक कार्यालय शासकीय कार्यालये दवाखाने इत्यादी ठिकाणी प्रबोधनाच्या माध्यमातून स्वच्छ व सुंदर वडूज साठी प्रयत्न केले गेले. स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत शहरातील सुंदर स्वच्छ सुंदर हॉटेल दवाखाना शाळा इत्यादींना मानांकन देण्यात आले. निबंध स्पर्धा स्वच्छता रॅली तसेच स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पूर्ण एक दिवसीय शहरात स्वच्छता मोहीम नालेसफाई तसेच नदीची स्वच्छता इत्यादी. कामे प्रभावीपणे सुरू झाली. शहरातील 17 प्रभागांमध्ये चर्चासत्र बैठका च्या माध्यमातून प्रबोधन करण्यात आले. 

शहरातील सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या भिंतीवरती स्वच्छतेचे संदेश देण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत शहराच्या बाजूस असणारे मोकळी जागा यामध्ये वृक्ष लागवड अभियान राबवून हरित वडूज करण्याची सुरुवात झाली. प्लास्टिक पूर्णपणे हद्दपार करून पर्यावरण पूरक कापडी पिशव्यांचा वापर व वाटप करण्यात आले. शहरात कोणत्याही प्रकारचा कचरा जाळल्यास अशा व्यक्तीं वरती दंड आकारण्यात आला. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी आवश्यकतेनुसार शहराच्या विविधतेत भर टाकणारी बगीच्या व या बागेच्या माध्यमातून विविध संदेश जनजागृतीचा प्रयत्न सुरू झाला. टाकाऊ पासून टिकाऊ हा संदेश देण्यात आला. 

स्वच्छ सर्वेक्षण 2020 अंतर्गत ज्या व्यक्तींना शौचालय उपलब्ध नाही त्यांना नगरपंचायत प्रशासनाकडून शौचालय बांधणी करिता अनुदान दिले गेले. त्यामुळे उघड्यावर शौच करणे तसेच थुंकणे इत्यादी गोष्टींना आळा बसला. यामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करताना मुख्याधिकारी श्री माधव खांडेकर, नगराध्यक्ष श्रीयुत. सुनील गोडसे, उपनगराध्यक्षा. सौ किशोरीताई पाटील, सर्व समितीचे सभापती, नगरसेवक, नगरसेविका नगरपंचायत वडूज कर्मचारीवृंद यांच्या अथक परिश्रम बद्दल आपल्या शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे आपल्या शहराने राष्ट्रीय पातळीवरील, गुणांकन यादीत स्थान पटकाविले आहे. ती प्रभावी कामगिरी निश्चितच इतर सर्व ग्रामीण व शहरी भागांना प्रेरणा देणारी आहे. आज या पुरस्काराची घोषणा झाली यामध्ये वडूज नगरपंचायतीने, थेट पश्चिम भारतात 49 व्या तर महाराष्ट्र मध्ये 34 व्या ठिकाणी गरुड झेप घेत वडूज शहराचा आणि जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला. या विशेष कामगिरीबद्दल देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री. उद्धवजी ठाकरे यांनी अभिनंदन केले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!