पतसंस्थांमधील संचालक, अधिकारी व कर्मचार्‍यांना सहकार क्षेत्रातील नवीन धोरणात्मक बदल माहिती होणे आवश्यक – दिलीपसिंह भोसले

श्री सद्गुरु प्रशिक्षण संस्थेत कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२४ | फलटण |
सहकार क्षेत्रात शासनाच्या वतीने करण्यात येत असलेले बदल, पतसंस्थांमध्ये वसुलीच्या अनुषंगाने होणारे धोरणात्मक बदल संचालक, कर्मचारी यांना माहिती होणे आवश्यक आहेत. या प्रशिक्षण कार्यशाळेची नितांत गरज आहे. यासाठी सहाय्यक निबंधक कार्यालय, फलटण व श्री सद्गुरु प्रशिक्षण संस्था नेहमीच अग्रेसर असते, असे प्रतिपादन श्री सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.

सहाय्यक निबंधक कार्यालय फलटण, श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था फलटण, गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पतसंस्थांचे वसुली अधिकार कसे वापरावेत याकरीता वसुली अधिकारी, संचालक व कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

दिलीपसिंह भोसले म्हणाले, राज्यात सहकार चळवळ अडचणीत असताना कार्यरत संस्था अत्यंत चिकाटीने कामकाज करीत आहेत. नवीन शासनाने सहकार चळवळ वाढवण्यासाठी बळ देणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सहकारी संस्थांनीही आपला कारभार पारदर्शक व काटकसरीने केल्यास निश्चितच संस्था नावारूपास येतील. अशा प्रशिक्षणातून सहकार विशेषत: पतसंस्थेत कार्यरत असणार्‍या सेवकांना माहिती देणे आवश्यक आहे.

फलटण तालुक्याचे सहाय्यक निबंधक यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना सांगितले की, वसुली या संस्थेचा आत्मा आहे. ज्या संस्थेची वसुली उत्तम आहे, त्या संस्थेचे आलेख भविष्यात चढता राहील. सहकार खात्याने नियमक मंडळामार्फत वेळोवेळी लागू केलेल्या नवीन नियमांचे पालन पतसंस्थांनी करणे गरजेचे आहे. आम्ही आमच्या कार्यालामार्फत वसुलीबाबत काही मार्गदर्शन व सहकार्य पतसंस्थांना उभारी मिळण्याकरिता करू शकतो, असे प्रतिपादन गावडे यांनी केले.

दोन दिवस चाललेल्या या प्रशिक्षणामध्ये गुलाबराव पाटील सहकार प्रशिक्षण केंद्र सांगलीचे उपप्राचार्य एस. एस. होनराव यांनी सहकारी कायदा कलम ९१ व १०१ अन्वये वसुली दाखला मिळवण्याची कार्यपद्धती, वसुलीशी संबंधित सहकारी कायद्यातील तरतुदी व सहकारी कायदा कलम १५६ चे महत्व, भारतीय करार कायदा वसुलीशी संबंधित परिपत्रके याविषयी मार्गदर्शन केले.

आर.डी. निकम सैनिक सहकारी बँक लि. साताराचे शाखाधिकारी रवींद्र जाधव यांनी सहकारी कायदा कलम १५६ व नियम १०७ नुसार स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती व लिलावाने विक्री भारतीय दंड संहिता अधिनियम १७२ ते कलम १९० याविषयी मार्गदर्शन केले.

वसुली व्याख्याता पुण्याचे आर. पी. यादव यांनी विकल्या न जाणार्‍या मालमत्तेचे हस्तांतरण, पेमेंट ऑफ व्हेज इज अ‍ॅक्ट व मुदत अधिनियम सहकारी कायदा कलम ४९ अन्वये वेतनातून कपात, सीपीसी कलम ६० व मालमत्ता हस्तांतरण कायदा याविषयी मार्गदर्शन केले.

या प्रशिक्षण शिबिरास संस्थेचे संचालक, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रास्ताविक करून आभार श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण सहकारी संस्था फलटणचे चेअरमन संदीप जगताप यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!