मनोज जरांगे यांची प्रकृती अचानक बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल


दैनिक स्थैर्य | दि. १८ मे २०२४ | छत्रपती संभाजीनगर |

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती शुक्रवारी अचानक खराब झाली आहे. त्यामुळे त्यांना छत्रपती संभाजीनगरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून आराम करण्याचा सल्ला दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूननंतर पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. मात्र, ८ जून रोजी भगवानगड म्हणजेच बीड जिल्ह्यात होणारी त्यांची सभा रद्द करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची प्रकृती खालावल्याने आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा ४ जूनपासून आंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी नारायण गडावर सभा होणार होती. मात्र, बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट आहे. त्यामुळे पाणी उपलब्ध नाही. तसेच उन्हाची तीव्रता देखील जास्त आहे. त्यामुळे एकत्र येणार्‍या मराठा बांधवांची गैरसोय नको, यासाठी नारायण गडावरील सभा रद्द करण्यात आली आहे. आता पुढील सभा कधी होणार? याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र, तूर्तास ८ जून रोजीची सभा रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मराठा आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील यांनी सगेसोयरेची मागणी पुन्हा एकदा करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी त्यांनी ४ जून पासून उपोषणाचा इशारा दिला आहे. मात्र, त्याआधीच त्यांची प्रकृती खराब झाल्याने उपोषणाचा निर्णय रद्द होतो की, ते पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात करतात, ते पाहावे लागेल. त्यांच्या डॉक्टरांनी मात्र, त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना ‘थ्रोट इन्फेक्शन’ झाले असल्याची माहिती देखील त्यांच्या डॉक्टरांनी दिली आहे. तसेच इतरही काही तपासण्या करण्यात आल्या असून त्यांचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही.


Back to top button
Don`t copy text!