भाजपाने रणजितसिंह यांचे पुनर्वसन करावे

सातारा जिल्हा बैठकीमध्ये एकमुखी ठराव

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ जून २०२४ | उपळवे | सोपानराव जाधव | माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये सर्वच्या सर्व सहाही आमदार युतीचे असताना केवळ नीरा-देवघर पाण्याच्या प्रश्नावर राजकीय भांडवल करून युतीत असूनही आघाडीला साथ देणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच आमदारांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीमध्ये युती धर्मात गद्दारी करून पाडण्याचे काम केले आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हे क्रियाशील खासदार व नेतेही आहेत. त्यांच्यात विकासाची कामे करण्याची धमक असून ते यापुढेही पराभव झाला म्हणून कधीही स्वस्थ बसणार नाहीत. पुढील काळातही ते राजकारणात व समाजकारणात आघाडीवर राहतील, पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नेहमी अग्रेसर राहणार्‍या रणजितसिंह यांचे खासदार उदयनराजे भोसले यांच्याप्रमाणेच पुनर्वसन करून त्यांना राज्यसभेवर पाठवावे, असा एकमुखी ठराव पश्चिम महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे संघटन महामंत्री मकरंद देशपांडे व सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या उपस्थितीत झालेल्या रेस्ट हाऊस येथील बैठकीमध्ये करण्यात आला.

फलटण तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे संघटक व क्रियाशील कार्यकर्ते श्री सोपानराव जाधव यांनी हा ठराव मांडला. या ठरावास अनुमोदन देताना फलटण शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अनुप शहा यांनी यापुढील विधानसभा निवडणुकीमध्ये युती धर्म न पाळणार्‍या कोणत्याही आमदाराला मग तो फलटणचा असला तरी त्यालाही आम्ही युती धर्माप्रमाणे मतदान करणार नाही, आम्हीही उद्याच्या विधानसभा निवडणुकीला गद्दारांना ‘जशास तसे’ उत्तर देऊ, असे म्हटले.

अनुप शहा पुढे म्हणाले की, ज्या ज्या मतदारसंघांमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये युती धर्मातील आमदारांनी कामे केली नाहीत, ज्यांच्या ज्यांच्या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना मतदान कमी झालेले आहे, त्या त्या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते किंवा पदाधिकारी आपली वेगळी उमेदवारी भरून त्या जागेवर ‘कमळ’ चिन्हावर लढण्याची हक्काची मागणी करणार असल्याचे अनुप शहा यांनी सांगितले.

या बैठकीस सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, फलटण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!