
फलटण येथील मंगळवार पेठेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक सोहळ्याचा शुभारंभ विधान परिषदेचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अनेक मान्यवर व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्थैर्य, फलटण, दि. १४ एप्रिल : विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज संपूर्ण फलटण शहरात मोठा उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने मंगळवार पेठ, फलटण येथून आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणूक सोहळ्याचा शुभारंभ आज आमदार सचिन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
‘जय भीम’च्या निनादात आणि निळ्या झेंड्यांच्या उत्साही वातावरणात या दिमाखदार मिरवणुकीला सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जयघोष करत निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:
या भव्य मिरवणुकीच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. यामध्ये ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील, नगरसेवक अशोकराव जाधव, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, महाराजा मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले, नगरसेवक सचिन अहिवळे, नगरसेवक सुदाम (अप्पा) मांढरे, युवा नेते सनी अहिवळे, अमोल सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
महामानवाला अभिवादन करण्यासाठी आणि या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी फलटण शहर व परिसरातील ‘भीम सैनिक’, नागरिक आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. डॉ. बाबासाहेबांच्या गीतांवर आणि ‘जय भीम’च्या घोषणांनी मंगळवार पेठ परिसर दुमदुमून गेला होता.
