
वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर उष्माघातापासून (Heatwave) बचाव करण्यासाठी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. ‘काय करावे आणि काय करू नये’ याबाबत प्रशासनाने सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
स्थैर्य, फलटण, दि. 14 एप्रिल : सध्या उन्हाळ्याची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढली असून, उन्हाच्या तीव्र झळा बसत आहेत. या उष्माघातापासून (Heatwave) नागरिकांनी आपला आणि आपल्या कुटुंबाचा बचाव करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे महत्त्वपूर्ण आवाहन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले आहे.
या अनुषंगाने नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी फलटणचे तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी नागरिकांनी उन्हाळ्यात ‘नक्की काय करावे आणि काय करू नये’, याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.
उष्माघातापासून बचावासाठी ‘काय करावे?’:
-
पाणी भरपूर प्या: तहान लागलेली नसली तरीही दर एका तासाच्या फरकाने पुरेसे पाणी प्या. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस (ORS), घरी बनवलेली लस्सी, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी, ताक यांचा नियमित वापर करा.
-
दुपारी बाहेर जाणे टाळा: अतिउष्णतेच्या काळात म्हणजेच दुपारी १२:०० ते सायंकाळी ४:०० या वेळेत घराबाहेर जाणे टाळा.
-
संरक्षण घ्या: घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करा. उन्हात काम करत असल्यास टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान व चेहरा झाकून घ्यावा. प्रवासात नेहमी पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
-
कपड्यांची निवड: हलके, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
-
घराची काळजी: सूर्यप्रकाशापासून वाचण्यासाठी घरातील पडदे आणि झडपांचा (शटर/सनशेड) वापर करा. घर थंड राहण्यासाठी रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे आणि ओले कपडे यांचा वापर करावा. वेळोवेळी थंड पाण्याने स्नान करावे.
-
कामाच्या ठिकाणी काळजी: पहाटेच्या वेळी किंवा उन्हाची तीव्रता कमी असताना जास्त कामाचा निपटारा करावा. कामगारांनी सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळावा. बाहेर कामकाज करत असल्यास मध्ये-मध्ये विश्रांती घेऊन आराम करावा. कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी.
-
गुराख्यांसाठी व प्राण्यांसाठी: गुरांना सावलीत/छावणीत बांधावे आणि त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे.
-
लक्षणे ओळखा: अशक्तपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम ही उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत. चक्कर येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची विशेष काळजी घ्यावी.
-
उष्णतेच्या लाटेच्या अद्ययावत माहितीसाठी रेडिओ, टीव्ही किंवा वर्तमानपत्रांचा वापर करावा.
उष्माघातापासून बचावासाठी ‘काय करू नये?’:
-
उन्हात अतिकष्टाची व शारीरिक श्रमाची कामे करणे टाळावे.
-
दुपारी १२ ते ४ च्या दरम्यान कडक उन्हात घराबाहेर फिरू नये.
-
शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करणारे पेय जसे की दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये (Cold Drinks) पिणे टाळावे.
-
उच्च प्रथिनयुक्त (High Protein) आणि शिळे अन्न खाऊ नये.
-
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या किंवा उन्हात पार्क केलेल्या वाहनात एकटे सोडू नये.
-
गडद रंगाचे, घट्ट व जाड कपडे घालणे टाळावे.
-
उन्हाच्या तीव्र कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे. हवा खेळती राहण्यासाठी स्वयंपाकघराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत.
नागरिकांनी या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उन्हाळ्यात स्वतःच्या व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.
