
शिवसेना नेते खा. श्रीकांत शिंदे व मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सोलापूर येथे झालेल्या आढावा बैठकीनंतर माढा व सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेची सर्व कार्यकारिणी (जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख) बरखास्त करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १४ एप्रिल : शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, माढा आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि सर्व अंगीकृत संघटनांची जिल्हाप्रमुख ते शाखाप्रमुख अशी संपूर्ण कार्यकारिणी तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून पक्षाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी याबाबतचे अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.
आढावा बैठकीनंतर तडकाफडकी निर्णय:
मिळालेल्या माहितीनुसार, काल (दि. १३ एप्रिल) सोलापूर येथे शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत एक महत्त्वाची आढावा बैठक संपन्न झाली होती. या बैठकीत पक्ष संघटनेच्या कामकाजाचा आणि आगामी रणनीतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर आणि पदाधिकाऱ्यांच्या मूल्यमापनानंतरच हा मोठा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
फलटण, माण, खटाव आणि कोरेगाव कार्यकारिणीवर थेट परिणाम:
या निर्णयाचा थेट परिणाम सातारा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळावरही होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ‘फलटण-कोरेगाव’ आणि ‘माण-खटाव’ हे दोन महत्त्वाचे विधानसभा मतदारसंघ ‘माढा लोकसभा’ मतदारसंघांतर्गत येतात. त्यामुळे सहाजिकच माढा लोकसभेची कार्यकारिणी बरखास्त झाल्याने फलटण, माण, खटाव आणि कोरेगाव येथील शिवसेनेची विद्यमान कार्यकारिणीही बरखास्त झाली आहे. (मात्र, कोरेगाव आणि खटाव हे तालुके पूर्णपणे माढा लोकसभा मतदारसंघात येत नसल्याने, त्याबाबतची नेमकी स्पष्टोक्ती अद्याप दिलेली नाही. तरीही या तालुक्यांच्या बहुतांश भागात याचा प्रभाव राहणार आहे.)
लवकरच नव्या नियुक्त्या; ‘कामगिरी’वर ठरणार पद:
या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केल्यानुसार, लवकरच सर्व विभागीय संपर्कप्रमुख, सह-संपर्कप्रमुख आणि लोकसभा संपर्कप्रमुखांच्या उपस्थितीत इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जातील. या मुलाखती आणि संपर्कप्रमुखांचा अहवाल आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नवीन शाखाप्रमुख ते जिल्हाप्रमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या जातील.
‘SIR’ मोहिमेत चांगली कामगिरी करणाऱ्यांनाच संधी:
विशेष बाब म्हणजे, पक्षातर्फे सध्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण (SIR)’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत सर्व शिवसैनिकांनी अत्यंत जोमाने काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मोहिमेत चांगली कामगिरी करणाऱ्या शिवसैनिकांची पक्षाकडून विशेष नोंद घेतली जाईल आणि त्यांच्या कामगिरीनुसारच त्यांना पदे दिली जातील, अशी स्पष्ट टीप या पत्रकात देण्यात आली आहे.
सदर माहिती पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्कप्रमुख दगडू सकपाळ, सह-संपर्कप्रमुख हनुमंत जगदाळे, सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख खासदार धैर्यशील माने आणि माढा लोकसभा संपर्कप्रमुख चंद्रहार पाटील यांनाही देण्यात आली आहे.
