इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज (खअकत) संस्थेच्या माध्यमातून फलटण नगर परिषदेकडे 8 ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन्स नगर परिषद सभागृहात समारंभपूर्वक सुपूर्द


 

स्थैर्य, फलटण, दि.१४: फलटण शहर व तालुक्यात कोरोना बाधीतांची संख्या सुमारे 2 हजारपर्यंत पोहोचली असून त्यापैकी 700 रुग्ण फलटण शहरात असल्याचे नमुद करीत आतापर्यंत 30 ते 40 दिवसांनी दुप्पट होणारी रुग्णसंख्या आता 15 दिवसात दुप्पट होत असून त्यामध्ये प्रामुख्याने वृध्दांची संख्या अधिक असल्याचे सांगून सप्टेंबर अखेर शहर व तालुक्यात बाधीत रुग्णांची संख्या 4 हजार पेक्षा अधिक होण्याची शक्यता नगर परिषद मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी व्यक्त केली आहे.

इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज (खअकत) या आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून जगभर कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून फलटण नगर परिषदेकडे 8 ऑक्सीजन कॉन्सेन्ट्रेटर मशीन्स नगर परिषद सभागृहात समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद काटकर बोलत होते. प्रभारी तहसीलदार आर.सी.पाटील, डॉ. संजय राऊत, डॉ. माधव पोळ, प्राचार्य रविंद्र येवले, अ‍ॅड. सचिन शिंदे, मराठा क्रांती मोर्चाचे माऊली सावंत, अभिजीत बेडके यांच्यासह मराठा क्रांतीमोर्चा व आर्ट ऑफ लिव्हींगचे पदाधिकारी उपस्थित होते.

शहर व तालुक्यातील स्वयंसेवी संस्था, व्यक्तींनी कोरोना रुग्णांवरील उपचार व अन्य सोयी सुविधांसाठी मदतीचा ओघ सुरु केला आहे. शहरात मराठा क्रांंती मोर्चाच्या माध्यमातून महाराजा संस्था समुहाने 20 बेडचे छ. शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर उभारले आहे अशी आणखी काही केअर सेंटर्स उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत तथापी या सेंटर्ससाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध होण्यात अडचणी असल्याने वाढत्या रुग्णसंख्येला पुरेशा प्रमाणात उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात अडचणी असल्याने रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठीच प्रत्येकाने योग्य दक्षता घेण्याची आवश्यकता मुख्याधिकारी काटकर यांनी स्पष्ट केली.

ऑक्सीजन सुविधेसह बेड उपलब्ध होत असताना अलिकडे ऑक्सीजनच्या पुरवठ्यामध्ये अनंत अडचणी येत आहेत पुरेशा प्रमाणात ऑक्सीजनचा पुरवठा होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली आहे, तथापी आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून आज उपलब्ध झालेली ऑक्सीजन सिलेंडर शिवाय हवेतून ऑक्सीजन घेवून रुग्णाला पुरवठा करणारी मशिन्स निश्‍चित उपयुक्त ठरणारी असून जागतिक स्तरावर काम करणार्‍या इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज (खअकत) या स्वयंसेवी संस्थेने सदर मशिन्स उपलब्ध करुन देण्यासाठी फलटणची निवड केली आणि गरजेच्यावेळी सदर मशिन्स उपलब्ध करुन दिल्याबद्दल आर्ट ऑफ लिव्हींग आणि या स्वयंसेवी संस्थेला धन्यवाद देत आगामी काळात अशी अधिक मशिन्स उपलब्ध करुन घेण्याची आवश्यकता मुख्याधिकारी काटकर यांनी व्यक्त केली.

प्रभारी तहसीलदार आर.सी.पाटील यांनी रुग्णसेवेसाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांची सेवा अत्यंत महत्त्वाची असून आज प्रत्येकजण 18 ते 20 तास काम करुनही ती सेवा पुरेशी होत नसल्याने त्यासाठी आणखी कर्मचारी उपलब्ध होण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर ऑक्सीजन सिलेंडर घेण्यासाठी गेलेल्या वाहनाला किमान 24 तास तेथे थांबावे लागत असल्याने आता हवेतून ऑक्सिजनचा पुरवठा करणार्‍या यंत्रणेचा निश्‍चित फायदा होणार असल्याने अशी मशिन्स मोठ्या संख्येने उपलब्ध करुन घ्यावी लागतील.

प्रारंभी आर्ट ऑफ लिव्हींग व स्वयंसेवी संस्थेच्यावतीने सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर अमोल येवले यांनी प्रास्तविकात या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून गेल्या 6 महिन्यात कोरोना उपचारासाठी जगभर विविध साधने, सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सुमारे 7 कोटी लोकांना अन्न पाकिटे तर विविध ठिकाणच्या हॉस्पिटलमध्ये सुमारे 40 कोटी रुपयांची वैद्यकिय उपकरणे उपलब्ध करुन देण्यात आली असून पुण्यात 1600 बेडचे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले.

केवळ शहरी भागात या सुविधा देण्यापेक्षा ग्रामीण भागातही त्याची गरज असल्याने त्यादृष्टीनेे विचार करण्यात आला असून फलटण येथे या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप, प्रभारी तहसीलदार आर.सी.पाटील, मुख्याधिकारी प्रसाद काटकर, गटविकास अधिकारी डॉ. सौ अमिता गावडे पवार, यांच्या सुचनेनुसार फलटणसाठी सदरची 8 ऑक्सीजन कॉन्संटे्रटर मशिन्स उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. कार्पोरेट संस्थांच्या सीएसआरचा एक भाग म्हणून या स्वयंसेवी संस्थेने पुण्यातील 1600 बेडच्या रुग्णालयाची उभारणी केली आहे. तर नायडू रुग्णालयात कायम ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा सुरु करण्याची प्रक्रिया कार्यान्वित होत असून अन्य शहरातही तेथील गरजेप्रमाणे मदत करण्यात येत असल्याचे स्पष्ट करीत सांगली, सोलापूर, उमरगा आणि फलटण या ठिकाणी प्रत्येकी 8 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर मशिन्स आणि लातुर येथे 1500 पीपीई कीट उपलब्ध करुन दिल्याचे अमोल येवले यांनी निदर्शनास आणून दिले.

सदर 8 मशिन्स उपलब्ध करुन दिल्याबद्दल आर्ट ऑफ लिव्हींग आणि छ. शिवाजी महाराज कोरोना केअर सेंटर उभारणी केल्याबद्दल नगर परिषदेच्यावतीने या दोन्ही संस्थांच्या पदाधिकार्‍यांचा यथोचित सत्कार प्रभारी तहसीलदार आर.सी.पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!