
स्थैर्य, सातारा, दि. १४ : देगाव फाटा ते देगावकडे जाणार्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्याला खड्डे पडले आहेत की खड्ड्यात रस्ता गेला आहे, हेच समजून येत नाही. या खड्ड्यांमुळे औद्योगिक वसाहतीमध्ये काम करणार्या अनेक कर्मचार्यांना मणक्याचा त्रास सुरू झाला आहे. या परिसराला दोन आमदार लाभूनही येथील रस्त्यांचे भाग्य उजळेना. दुसरीकडे बांधकाम विभागानेही चुप्पी साधल्यामुळे वाहन चालकांना आपले दुखणे अंगावर काढण्याची वेळ आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की सातारा शहर उपनगरातील अनेक कामगार औद्योगिक वसाहतीमधील कंपनीमध्ये नोकरी करत आहेत. त्यांना दुचाकी अथवा चारचाकी वाहनातून देगाव फाटा येथून जावे लागते. गेली वर्षभर देगाव फाटा ते देगावकडे जाणार्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर भले मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी तर रस्ताच खड्ड्यात गेल्याचे चित्र दिसून येत आहे. देगाव फाटा ते अमरलक्ष्मी स्टॉप दरम्यान या रस्त्याच्या दुतर्फा गटारे नसल्यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते. काही ठिकाणी ते रस्त्यावरच साचून राहते. देगाव फाटा ते अमरलक्ष्मी स्टॉप दरम्यान रस्त्याची अत्यंत दैना झाली असल्यामुळे येथील रस्त्यावर वाहन चालवणे एक कसरत होऊन बसली आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वाहने आढळून अनेकांना मणक्याचे त्रास उद्भवले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांची दुरवस्था होऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र मूग गिळून गप्प बसले असल्यामुळे वाहनचालकांवर डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे.
याबाबत काही उद्योजकांची संपर्क साधला असता ते म्हणाले, 2015 – 16 साली कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आ. शशिकांत शिंदे यांची भेट घेऊन औद्योगिक वसाहतीमधील रस्त्यांची कामे करण्याबाबत त्यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. आ. शशिकांत शिंदे यांनी या मागणीची तातडीने दखल घेऊन तत्कालीन उद्योगमंत्र्यांसह उद्योजकांची बैठक घेऊन सातारा औद्योगिक वसाहत येथील रस्त्यांची कामे करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली होती. आ. शशिकांत शिंदे यांच्या मागणीची तत्काळ दखल घेऊन देगाव फाटा ते कारंडवाडी रस्त्यासह औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांसाठी 16 कोटी रुपये मंजूर झाले होते. 2015- 16 साली या रस्त्यांची कामे पूर्ण झाली होती.
दरम्यान, गेल्या चार वर्षानंतर मात्र या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले नाहीत. या रस्त्यांची मालकी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होती. मात्र त्याच्या डागडुजीची जबाबदारी औद्योगिक वसाहत कार्यालयाकडे देण्यात आली होती. मात्र या रस्त्याच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर औद्योगिक वसाहत कार्यालयाने डागडुजीसाठी या रस्त्याचे हस्तांतरण पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केले आहे. या परिसराचा समावेश कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये झाला आहे. या मतदारसंघातून आ. महेश शिंदे हे निवडून आले आहेत तर याच मतदारसंघातील माजी आमदार शशिकांत शिंदे यांना विधानपरिषदेवर संधी दिल्यामुळे या मतदारसंघाला दोन आमदार लाभले आहेत. हे दोन्ही आमदार या रस्त्याच्या डागडुजीकडे केव्हा लक्ष देतात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.