
स्थैर्य, दि.१६: अॅपलने आपले नवे गॅजेट्स सादर केले आहेत. यात सिरीज-६ स्मार्ट वॉचचा समावेश आहे. आतापर्यंत हृदयाचे ठोके आणि ईसीजी घेऊ शकणाऱ्या अॅपल वॉचच्या नव्या आवृत्तीत शरीरातील ऑक्सिजनची पातळीही सहज कळू शकेल. कोरोना काळातील हे कंपनीचे मोठे यश मानले जाते. वॉच सिरीज-६ (जीपीएस)ची प्रारंभीची किंमत ४०,९०० रुपये आणि वॉच सिरीज-६ (जीपीएस+ सेल्युलर)४९,९०० पासून सुरू होईल. कंपनीने आतापर्यंतचे सर्वात स्वस्त अॅपल वॉच एसई हे पण लाँच केले. याची प्रारंभीची किंमत १९९ डॉलर (सुमारे १४,५०० रुपये) आहे. अॅपल वॉच एसईची किंमत २७९ डॉलर (२०,५०० रुपये) आहे. मात्र, कंपनीने बहुप्रतीक्षित आयफोन-१२ लाँच केला नाही. याचे अपडेटही कंपनीने दिले नाही. कंपनीचे सीईओ टिम कूक यांनी व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये हे गॅजेट्स लाँच केले.
दोन आयपॅड लाँच: अॅपलने आयपॅड एअर २०२० लाँच केले. यात वेगवान बायोनिक १४ प्रोसेसर असून १२ मेगापिक्सेलचा रिअर आणि ७ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. किंमत सुमारे ४४ हजार रुपये असेल. आयपॅड-४ मध्ये हाय रिझोल्युशन कंटेंट पाहता येईल. अँड्रॉइड टॅबपेक्षा तो तिप्पट वेगवान आहे. बॅटरी लाइफ १८ तास असून याची किंमत २६ हजारांपासून सुरू होईल.
अॅपल वॉचचे वैशिष्ट्य
लाँच इव्हेंटमध्ये टिम कुक यांनी आजच्या काळात अॅपल वॉचच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल माहिती दिली. विशेषत: आजच्या साथरोगात आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने असलेले याचे महत्त्व त्यांनी सांगितले.